काँग्रेस पैशासाठी जितकी आतुर आहे तितकीच ती मतांसाठीही हतबल आहे.
भाजप खात्यात 6,900 कोटी, काँग्रेस 53 कोटी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
विविध राजकीय पक्षांनी त्यांच्या पैशांचा हिशेब केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर केला आहे. या हिशेबांच्या अनुसार भारतीय जनता पक्षाच्या बँक खात्यामध्ये केंद्र आणि राज्ये मिळून 6 हजार 900 कोटी रुपयांची शिल्लक असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचा बँक बॅलन्स मात्र, अवघा 53 कोटी रुपयांचा आहे. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय पक्षांनी त्यांचे हिशेब सादर केले आहेत.
अशा प्रकारे काँग्रेसला आता मतांना लागलेल्या ओहोटीप्रमाणे पैशाची चणचणही सहन करावी लागत आहे, असे दिसून येत आहे. बहुजन समाज पक्षाच्या खात्यातही काँग्रेसपेक्षा जवळपास दसपण अधिक रक्कम असल्याचे स्पष्ट झाले आहे. आम आदमी पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्या खात्यांमध्ये काँग्रेसपेक्षाही कमी रक्कम आहे. ती अनुक्रमे 9.9 कोटी रुपये आणि 4 कोटी रुपये अशी आहे. तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या खात्यात अवघे 41 लाख रुपये आहेत. नियमाप्रमाणे बहुतेक सर्व पक्षांनी त्यांचे हिशेब आयोगाकडे सादर केले.
हिशेबांचा नियम काय आहे…
हिशेब सादर करण्याच्या नियमानुसार प्रत्येक मान्यताप्राप्त आणि नोंदणीकृत राजकीय पक्षाला प्रत्येक वर्षी त्याचा जमाखर्च केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागतो. 20 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम देणखी म्हणून कोणाकडूनही मिळाली असेल, तर अशा देणग्यांचा हिशेब सादर करावा लागतो. तसेच या देणग्या कोणाकडून मिळाल्या, त्याचीही माहिती घोषित करावी लागते. प्रत्येकी 20 हजार रुपयांपेक्षा कमी देणग्या मिळाल्या असतील, तर त्यांचा हिशेब द्यावा लागत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या हिशेबांमध्ये नमूद असलेल्या देणग्यांपेक्षा कितीतरी अधिक देगण्या राजकीय पक्षांना मिळालेल्या असू शकतात.
प्रत्येक निवडणुकीनंतर…
देशातील प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या नंतर प्रत्येक राजकीय पक्षाला त्याचे हिशेब केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर करावे लागतात. दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतरचे हिशेब सादर करण्यात आले आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीनंतरचे हिशेब मात्र, अद्याप, कोणत्याही राजकीय पक्षाने आयोगाकडे सादर पेलेले नाहीत. राजकीय पक्षांना प्रत्येक वर्षी आपल्या हिशेबांची तपासणीही नियमानुसार करुन घ्यावी लागते.
सत्ताधारी पक्षाला अधिक रक्कम
सर्वसाधारणपणे सत्ताधारी पक्षाला देणग्यांच्या स्वरुपात मिळणारी रक्कम विरोधी पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांपेक्षा अधिक असते. काँग्रेस सत्तेवर असताना त्या पक्षालाही इतर पक्षांपेक्षा अधिक देणग्या मिळत असत. तथापि, आता केंद्रात आणि बव्हंशी राज्यांमध्ये हा पक्ष सत्तेवर नाही. त्यामुळे त्याला मिळणाऱ्या देणग्यांच्या प्रमाणातही घट झाली आहे. तथापि, कोणत्याही राजकीय पक्षाला 20 हजार रुपयांपेक्षा कमी रकमेच्या देणग्या देणाऱ्या देणगीदारांचे प्रमाण मोठे असते. मात्र, अशा देणग्या देणाऱ्या देणगीदारांची नावे घोषित करण्याची आवश्यकता नसते. हिशेब ठेवताना मात्र, या देणग्यांचाही हिशेब ठेवावा आणि दाखवावा लागतो.
Comments are closed.