काँग्रेसने कार्यालये रिकामी करण्याची नोटीस बजावली
28 मार्च पर्यंत कालावधी, अन्यथा कारवाई होणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीतील अकबर मार्ग आणि रायसिना मार्ग येथील कार्यालये रिकामी करण्यात यावीत, अशी नोटीस केंद्र सरकारने काँग्रेस पक्षाला दिली आहे. ही कार्यलये सोडण्यासाठी 28 मार्चपर्यंत कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीत कृती न केल्यास कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. काँग्रेसने केंद्र सरकारच्या या आदेशावर टीका करत नाराजी व्यक्त केली.
24, अकबर मार्ग आणि 5, रायसिना मार्ग ही दोन्ही कार्यालये काँग्रेससाठी महत्वाची आहेत. 24, अकबर मार्ग हे कार्यालय स्वातंत्र्य मिळाल्यापासून, अर्थात गेली 78 वर्षे काँग्रेसकडून उपयोगात आणले जात आहे. रायसिना मार्गावरील कार्यालयही काँग्रेससाठी ऐतिहासिक दृष्ट्या आणि भावनिक दृष्ट्या महत्वाचे आहे. ही दोन्ही कार्यालये सरकारी निवासस्थानांमध्ये आहेत. त्यांच्या उपयोगाचा कालावधी संपला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ती रिकामी करण्यासाठी नोटीस पाठविली आहे. उपयोग करण्याचा कालावधी संपल्यानंतरही काँग्रेसने ही निवासस्थाने कार्यालये म्हणून उपयोगात आणली आहेत. पण आता केंद्र सरकारने कठोर आणि आक्रमक पावले उचलण्याचा निर्धार केला असल्याचे दिसून येत आहे.
कायदेशीर मार्ग चोखाळणार
केंद्र सरकारच्या या नोटीसीविरोधात न्यायालयात जाण्याचा विचार काँग्रेसकडून केला जात आहे. तथापि, न्यायालयात जाण्याइतकाही वेळ आता उरलेला नाही. 28 मार्चपर्यंत कार्यालये खाली केली नाहीत, तर केंद्र सरकार त्यांचा ताबा घेण्याची शक्यता आहे. कालावधी संपल्याने केंद्र सरकारला ही कार्यालये ताब्यात घेण्याचा अधिकार आहे, असेही काही काँग्रेस नेत्यांनी खासगीत मान्य केले आहे.
अन्य उपायांचा विचार
काँग्रेसच्या एक-दोन ज्येष्ठ नेत्यांना राज्यसभेवर निवडून आणयचे आणि त्यांना ही निवासस्थाने द्यावीत अशी मागणी केंद्र सरकारकडे करायची, या उपायावर काँग्रेसमध्ये विचारमंथन केले जात आहे. राज्यसभा सदस्यांना ही निवासस्थाने मिळाली, की त्यांचा उपयोग पक्षाची कार्यालये म्हणून करण्यास कोणतीही अडकाठी राहणार नाही, असा काँग्रेसचा विचार आहे. तथापि, राज्यसभा निवडणकांची एक फेरी नुकतीच पूर्ण झाली असून निवडून आलेल्या खासदारांना निवासस्थानेही नेमून देण्यात आली आहेत. राज्यसभा निवडणुकांची पुढची फेरी अद्याप लांब आहे. त्यामुळे हा उपायही फारसा यशस्वी ठरण्याची शक्यता नाही, असा मतप्रवाह आहे.
अकबर मार्ग कार्यालय महत्वाचे का…
24, अकबर मार्ग या पत्त्याचे कार्यालय काँग्रेससाठी महत्वाचे आहे. कारण याच वास्तूतून स्वातंत्र्यापासून काँग्रेसने आपले काम चालविले आहे. अनेक महत्वाचे निर्णय या कार्यालयातून घेण्यात आले आहेत. काँग्रेसकडून नियुक्त करण्यात आलेल्या प्रत्येक महत्वाच्या नेत्याचे पाय या कार्यालयाला लागले आहेत. नेहरु, लालबहादुर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव, मनमोहन सिंग इत्यादी नेत्यांसह इतर मान्यवरांनी याच कार्यालयात काँग्रेसची धोरणे निर्धारित केली. ही कार्यालये काँग्रेसच्या आतापर्यंतच्या सर्व चढउतारांची साक्षीदार आहेत. दिल्लीच्या गजबजलेल्या मार्गांवर ती असल्याने जाण्यायेण्यासाठी सुलभ आहेत. त्यामुळे ती सोडण्यास काँग्रेस राजी नाही. पण आता केंद्र सरकारने निर्धार केला असल्याने काँग्रेसच्या हाती फारसे काही उरलेले नाही, अशी परिस्थिती आहे.
Comments are closed.