स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर प्रदीर्घ चर्चा, काँग्रेस नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट; विरोधी पक्षनेते पदाबाबत मसलत

काँग्रेस नेत्यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर प्रदीर्घ चर्चा झाली. त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते पदाबाबतही मसलत झाली. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, अमीन पटेल यांनी आज दुपारी ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यासंदर्भात यावेळी काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी विस्तृत चर्चा केली.

निवडणुकांना सामोरे जात असतानाच विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये रिक्त असलेली विरोधी पक्षनेते पदेही भरली गेली पाहिजेत यावरही यावेळी विचारविनिमय झाला. विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेनेने विधानसभा अध्यक्षांकडे पूर्वीच दावा केला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीची मुदत 31 ऑगस्टला संपली. त्यामुळे ते पद रिक्त झाले आहे. त्याबाबत महाविकास आघाडीची भूमिका काय असावी, याबाबत काँग्रेस नेत्यांनी आपली मते मांडली. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी, महाविकास आघाडीतील समन्वय या अनुषंगानेही बैठकीत चर्चा झाली. बाळासाहेब थोरात यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली.

राम शिंदे यांचीही घेतली भेट

‘मातोश्री’वरील बैठकीचा तपशील पक्षश्रेष्ठींना कळवण्यात येईल असे थोरात यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर काँग्रेस नेत्यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचीही भेट घेतली. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे.

विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या 78 आहे. त्यापैकी सत्ताधारी महायुतीचे 40 सदस्य आहेत, तर विरोधी पक्षातील महाविकास आघाडीकडे 16 सदस्य आहेत. त्यात शिवसेनेचे 6, काँग्रेसचे 8, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 सदस्य आहेत, तर 22 जागा रिक्त आहेत.

Comments are closed.