Congress mp Praniti Shinde attack on dhananjay munde and devendra fadnavis
मुंबई – बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकणी सीआयडीने हजारो पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रातील काही फोटो सोमवारी रात्री समोर आले. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटायला लागल्या. जनतेमधून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी होऊ लागली. जनतेचा वाढता रोष लक्षात घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी (4 मार्च) सकाळी राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर वैद्यकीत कारणामुळे राजीनामा देत असल्याचे ट्विट केले. यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. यावरुन विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्यासह महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनीही धनंजय मुंडे आणि महायुती सरकावर टीकेची झोड उठवली आहे.
मुंडेच्या राजीनाम्याचा केवळ फार्स
खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, धनंजय मुंडे हे संतोष देशमुख हत्येची नैतिक जबाबदारीही स्वीकारायला तयार नाहीत. त्यांनी वैद्यकीय कारणामुळे राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडे यांचे जे फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहे, ते कोणाच्या सांगण्यावरुन काढण्यात आले हे जगजाहीर आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिने झाल्यानंतर आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला आहे. हा केवळ फार्स आहे. सहा महिन्यानंतर हे सरकार धनंजय मुंडे दोषी नाही, असे म्हणत यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देईल, अशी टीका खासदार प्रणिती शिंदे यांनी केली.
मुख्यमंत्री फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे
प्रणिती शिंदे म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांना हत्याकांड प्रकरणात सहआरोपी करण्यात आले पाहिजे. त्यांच्या दहशतीचे हे काही पहिले प्रकरण नाही, मात्र उघडकीस आलेलं हे पहिल प्रकरण आहे, असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला. ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याचे फोटो पाहवत नाही. ज्या लोकांनी हे फोटो पाहिले त्यांना रात्रभर झोप लागली नाही. मात्र सरकार निवांत आहे. खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे.
प्रणिती शिंदेंनी जानेवारीमध्ये दिली होती मस्साजोगला भेट
खासदार प्रणिती शिंदे यांनी जानेवारीमध्ये मस्साजोगला भेट दिली होती. देशमुख कुटुंबियांच्या भेटीनंतर त्या म्हणाल्या होत्या की, लॉरेन्स बिश्नोईपासून वाल्मीक कराडपर्यंत आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे. महाराष्ट्राचा यूपी-बिहार केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मी जेव्हा बीडला गेलेली तेव्हा देशमुख यांची मुलगी मला म्हणत होती, “ताई मला खूप भीती वाटते, मला ही पोलीस प्रोटेक्शन ची गरज आहे आणि सरकार मला अजूनही देत नाहीये.” त्यामुळे तुम्ही विचार करा की किती दहशतीचे वातावरण त्याठिकाणी निर्माण झाले आहे. त्या ठिकाणी गुन्हेगार जेलमध्ये बसून इंटरव्यू देत आहेत. त्यांच्यासाठी स्टुडिओ सेटअप केला जात आहे. गुन्हेगारांना व्हीआयपी ट्रीटमेंट देत असतील, चुकीची एफआयआर दाखल करण्यासाठी पोलिसांवर प्रचंड दबाव टाकला जात आहे. डॉक्टरांवरती पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव येत असेल तर सामान्य माणसांनी जायचं कुठे?
हेही वाचा : Dhananjay Munde : राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंचा पाय खोलात; सहआरोपी करण्याची या नेत्याची मागणी
Comments are closed.