मुंबईत काँग्रेसला हवीयं वंचितची साथ! सर्वच महापालिकांमध्ये आघाडीसाठी आटापिटा सुरू

मुंबई महानगरपालिकेमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱया काँग्रेसला आता मुंबईसह राज्यभरात वंचित बहुजन आघाडीची साथ हवी आहे. त्यासाठी प्रदेश काँग्रेसकडून आता आटापटा सुरू झाला आहे.

राज्यातील महानगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने आघाडी करण्याचे निर्णय स्थानिक नेतृत्वांकडे दिले होते तसेच अधिकार वंचितनेही दिले होते. वंचित व काँग्रेसची आघाडी व्हावी अशी अनेकांची इच्छा आहे आणि त्यादृष्टीने दोन्ही बाजूंच्या नेत्यांचा चांगला संवाद आणि प्रामाणिक प्रयत्न सुरू असल्याची माहिती काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

शिवसेनेशी चर्चा

महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचा घटक पक्ष नात्याने शिवसेनेशी चर्चा सुरू आहे. संघटनेच्या नेत्यांना तशा सूचना दिल्या आहेत, याशिवाय कोणत्याही पक्षाचा आघाडीसाठी प्रस्ताव आलेला नाही, तसा प्रस्ताव आला तर विचार केला जाईल, असे सपकाळ म्हणाले.

सोशल इंजिनीअरिंग लक्षात घेऊन तिकीट वाटप

राज्यातील 28 महानगरपालिकांसाठी काँग्रेस पक्षाच्या राज्य निवडमंडळाची बैठक आज टिळक भवन पार पडली. यामध्ये  जिल्हा काँग्रेस कमिटयांच्या शिफारसी आणि सोशल इंजिनीअरिंग लक्षात घेऊन तिकिट वाटपाची चर्चा करण्यात आली. त्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा आज पार पडला असल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष सपकाळ यांनी दिली.

मुंबई महापालिकेतील आघाडीच्या चर्चेचा मी भाग नाही पण अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव यु. बी. व्यंकेटश वंचित बहुजन आघाडीबरोबर चर्चा करत आहेत, यासाठी तिघांकडे पक्षाने संवादाची जबाबदारी सोपवली असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.