Congress State President Harshwardhan Sapkal informed that Sadbhavana Padayatra will be held in Beed district on March 8
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्यानंतर बीडमध्ये सामाजिक सौहार्दाला तडा गेला आहे. या पार्श्ववभूमीवर सामाजिक सलोखा, बंधुभावाची पुनर्स्थापना करण्यासाठी आणि महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी येत्या 8 मार्चला बीड जिल्ह्यात काँग्रेस सद्भावना पदयात्रा काढणार आहे.
News By Premanand Bachhav
मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्यानंतर बीडमध्ये सामाजिक सौहार्दाला तडा गेला आहे. या पार्श्ववभूमीवर सामाजिक सलोखा, बंधुभावाची पुनर्स्थापना करण्यासाठी आणि महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी येत्या 8 मार्चला बीड जिल्ह्यात काँग्रेस सद्भावना पदयात्रा काढणार आहे. या पदयात्रेची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी (ता. 24 फेब्रुवारी) दिली. हर्षवर्धन सपकाळ यांनी आज सोमवारी टिळक भवनमध्ये जिल्हाध्यक्षांची बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सपकाळ यांनी सद्भावना पदयात्रेची माहिती दिली. (Congress State President Harshwardhan Sapkal informed that Sadbhavana Padayatra will be held in Beed district on March 8)
प्रसार माध्यमांसमोर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राने कायमच देशाला दिशा दिलेली आहे. परंतु मागील काही दिवसात राज्यातील सामाजिक वातावरण बिघडलेले आहे. यात बीड जिल्ह्याचा वारंवार उल्लेख केला जातो. या जिल्ह्यात स्त्री-पुरुष लोकसंख्येच्या गुणोत्तरातही मोठी तफावत आहे. स्त्री भ्रूण हत्येचा प्रश्न या जिल्ह्यात ऐरणीवर आला होता. त्यामुळे जागतिक महिला दिनाचे औचित्य लक्षात घेऊन बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथून पदयात्रा सुरु केली जाणार आहे. भगवानगड आणि नारायणगड या महत्वाच्या प्रेरणास्थानी वंदन करून सामाजिक सद्भावनेसाठी साकडे घातले जाणार आहे. त्यानंतर 8 मार्च रोजी सकाळी मस्साजोग येथून ही पदयात्रा सुरू होईल. तिथून नांदूरफाटा, येळंब, नेकनूर, मांजरसुंभा, पाली या मार्गावरून 51 किलोमीटरचा प्रवास करून यात्रा बीड शहरात पोहोचेल. 9 मार्चला बीड शहरात सद्भावना सभेने या यात्रेचा समारोप होईल, अशी माहिती सपकाळ यांनी दिली.
सद्भावना यात्रा ही राज्यातील सामाजिक सलोखा आणि बंधुभाव पुनर्स्थापित करण्यासाठी आहे. हा राजकीय नाही तर एक सामाजिक उपक्रम आहे. ज्याची सध्या महाराष्ट्राला अत्यंत आवश्यकता आहे. सध्या दूषित झालेले सामाजिक वातावरण बदलण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक, तरुण, महिला, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, पत्रकार, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून करण्यात आले आहे.
Comments are closed.