कॉंग्रेस, तृणमूल यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला

बनावट मतदार ओळखपत्रावर चर्चा न झाल्याने संताप : लोकसभेतही पडसाद

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात सोमवारी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मतदार ओळखपत्रासंबंधीचा मुद्दा उपस्थित करत चर्चेची मागणी केली. तृणमूल काँग्रेस (टीएमसी), काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या 10 खासदारांनी सोमवारी राज्यसभेमध्ये डुप्लिकेट मतदार ओळखपत्राचा मुद्दा मांडला. मात्र, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी त्यांच्या चर्चेच्या मागणीला नकार दिला. याचा निषेध म्हणून काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी राज्यसभेतून सभात्याग केला. लोकसभेमध्येही काँग्रेस आणि तृणमूलने यासंबंधीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर गोंधळ झाला.

होळीच्या सणामुळे चार दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पुन्हा सुरू झाले. लोकसभेमध्ये अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्व खासदारांना होळीच्या शुभेच्छा देत प्रश्नोत्तराच्या तासाचे कामकाज सुरू केले. याचदरम्यान, तृणमूल काँग्रेस खासदार डेरेक ओब्रायन यांनी डुप्लिकेट मतदार ओळखपत्रांच्या मुद्यावर चर्चेची मागणी उपस्थित केली. हा मुद्दा लोकशाहीच्या पारदर्शकतेशी आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेशी संबंधित असल्यामुळे त्यावर खुली चर्चा झाली पाहिजे, असे मत विरोधकांनी सभागृहात मांडले. त्याव्यतिरिक्त काँग्रेस खासदार माणिकम टागोर यांनी लोकसभेत स्थगन प्रस्ताव मांडला असून त्यात नीट पेपर लीकसह परीक्षा पेपर लीकवर चर्चा करण्याची मागणी केली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात लोकसभेत प्रमुख अहवाल आणि रेल्वे अनुदानांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय, सरकार अनेक महत्त्वाची विधेयके देखील सादर करू शकते. संसदेच्या या अधिवेशनात विरोधी पक्ष विविध मुद्यांवर सरकारला घेरण्याची रणनीती देखील बनवू शकतात.

वर्षा गायकवाड यांचा रेल्वेमंत्र्यांवर निशाणा

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी अनुदान मागण्यांवरील चर्चेत भाग घेत लोकसभेत रेल्वेमंत्र्यांवर निशाणा साधला. जेव्हा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व्हेंटिलेटरवर असतो तेव्हा इन्स्टाग्राम रील्स बनवून काही फायदा होत नाही असे त्या म्हणाल्या. सरकारच्या चुकीच्या व्यवस्थापनाचा हा परिणाम असल्याचे त्यांनी नमूद केले. रेल्वे अर्थसंकल्पात अभूतपूर्व बदल करण्यात आल्याचा दावा केला जात आहे, परंतु हे चुकीचे आहे. सत्य हे आहे की हे एक अयशस्वी बजेट आहे. सध्याचे सरकार केवळ सर्व विकास 2014 नंतर झाला असा दावा वारंवार करत असते. मात्र, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची अवस्था वाईट असल्याची वस्तुस्थिती मांडत त्यांनी रेल्वे विभागातील अनेक त्रुटींची माहिती सभागृहाला दिली.

जगन्नाथ यात्रेचा जागतिक वारशात समावेश करण्याची मागणी

ओडिशाच्या जगन्नाथ यात्रेला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याचा मुद्दाही संसदेत उपस्थित करण्यात आला. भाजप खासदार संबित पात्रा यांनी सभागृहात ही मागणी केली आहे. याला उत्तर देताना केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले की, यावर्षी जागतिक वारसा यादीत समावेश करण्यासाठी 6 ठिकाणे पाठविण्यात आली आहेत आणि ही सूचना देखील स्वागतार्ह असल्याचे त्यांनी सांगितले.

मखानालाही एमएसपी यादीत समाविष्ट करण्याचा आग्रह

जेडीयुचे खासदार संजय झा यांनी सोमवारी राज्यसभेत मखाना शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा मुद्दा उपस्थित केला. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना योग्य भाव मिळावा यासाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) असलेल्या अन्नपदार्थांच्या यादीत मखाना समाविष्ट करण्याची मागणी सरकारकडे केली. राज्यसभेत शून्य प्रहरात संजय झा यांनी हा मुद्दा उपस्थित केला. मल्लाह श्रेणीतील आणि अत्यंत मागासलेल्या समाजातील पाच लाखांहून अधिक कुटुंबांचे जीवनमान बिहारमधील मखानाच्या उत्पादन आणि प्रक्रियेशी जोडलेले आहे. मखानाची लागवड ही एक कठीण आणि कष्टाची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेला खूप वेळ लागतो आणि मजुरीवर खूप पैसा खर्च होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.