कोल्हापुरात सतेज पाटील यांची यशस्वी झुंज; काँग्रेस मोठा पक्ष, महायुतीला दिग्गजांच्या प्रभावातही काठावरचे बहुमत

कोल्हापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसचे विधिमंडळातील गटनेते, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिलेली झुंज यशस्वी ठरली. काँग्रेस पक्षाला 34 आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला एक अशा एकूण 35 जागांवर विजय मिळविला. दरम्यान, 81 जागा असलेल्या महापालिकेत चार सदस्य प्रभाग रचनेमुळे महायुतीला काठावरचे बहुमत मिळाले. यामध्ये भाजप 26, शिंदे गट 15, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 4 जागा मिळाल्या. जनसुराज्य पक्षाला एक जागा मिळाली.

सत्ताधारी महायुती नेत्यांच्या प्रभावातही सतेज पाटील यांनी दिलेली एकाकी दिलेली लढत लक्षवेधी ठरली आहे. कसबाबावडा, लाईन बाजार या बालेकिल्ल्यात त्यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. आजच्या निकालात दोन माजी महापौर, दोन माजी उपमहापौरांसह 16 माजी नगरसेवक विजयी झाले. तर 13 माजी नगरसेवक पराभूत झाले.

यंदा चार सदस्यांचा एक प्रभाग असल्याने, साहजिकच ते महायुतीच्या पथ्यावर पडेल असा राजकीय अंदाज यानिमित्ताने खरा ठरल्याचे दिसून आले. येथे महायुतीविरुद्ध काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यात थेट लढत झाली. उमेदवारी जाहीर करण्यापासून ते लोकसहभागातून केलेला जाहीरनामा जाहीर करून सतेज पाटील आघाडीवर राहिले. प्रचारातही शहराच्या विकासाबाबत सातत्याने त्यांनी सकारात्मक प्रचार केला. त्या तुलनेत महायुतीचा वैयक्तिक टीकाटिपण्णीवरच भर राहीला.

शिवसेनेच्या प्रतिज्ञा उत्तुरे विजयी

प्रभाग क्रमांक 15 (ब) मधून शिवसेनेच्या  जिल्हा महिला संघटिका व माजी नगरसेविका प्रतिज्ञा महेश उत्तुरे या विजयी झाल्या आहेत.

सांगलीत भाजपला रोखले

सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीत एकाही पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. सत्ता मिळविण्यासाठी मोठे त्रांगडे निर्माण झाले आहे. सर्वाधिक 78 जागा लढवणाऱया भाजपला 39 जागांवर मतदारांनी रोखले. काँग्रेस पक्षाला 18 जागा, तर राष्ट्रवादी (अजित पवार) गटाने 16 जागा आणि राष्ट्रवादी (शरद पवार) गटाला तीन जागा मिळाल्या.

सांगली महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी इतर पक्षांशी तडजोड करावी लागणार आहे. विशेष म्हणजे निवडणूक काळात अजित पवार गटाचे उमेदवार अजीम काझी यांना पोलिसांनी हद्दपार केले ते चांगल्या मताधिक्याने विजयी झाला.

Comments are closed.