तिरंगा फाडला, हिंदुस्थानविरोधी घोषणाबाजी; टेक्सासमधील घटनेनंतर हिंदुस्थानी वंशाचे खासदार राजा कृष्णमूर्तींनी व्यक्त केली चिंता
अमेरिकेतील हिंदुस्थानविरोधी द्वेषाच्या वाढत्या घटनांबद्दल हिंदुस्थानी वंशाचे अमेरिकन खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी चिंता व्यक्त केली आहे. प्रत्येक अमेरिकन नागरिकाने कोणत्याही प्रकारची कट्टरता, पूर्वग्रह आणि भेदभावाच्या विरोधात एकत्र येऊन उभे राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे. इलिनॉय प्रांताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी गुरुवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत टेक्सास राज्यातील फ्रिस्को शहरात घडलेल्या धक्कादायक घटनेचा उल्लेख केला. व्हाईट सुप्रिमॅसिस्ट या गटाने थेट सिटी हॉलसमोर हिंदुस्थानविरोधी घोषणाबाजी करत हिंदुस्थानाचा राष्ट्रध्वज फाडला होता.
मला अमेरिकेतील हिंदुस्थानविरोधी द्वेषाच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता वाटत आहे. अवघ्या काही आठवड्यांपूर्वी टेक्सासमधील फ्रिस्को येथे व्हाईट सुप्रिमॅसिस्टचा गट सिटी हॉलसमोर जमा झाला होता. या गटाने हिंदुस्थानात परत जा… टेक्सासमधील हिंदूंचे वर्चस्व थांबवा. तुम्ही आमची जागा घेऊ शकत नाही अशा आक्षेपार्ह घोषणा दिल्या, असे राजा कृष्णमूर्ती यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, अमेरिकेत अशा प्रकारच्या द्वेषाला अजिबात जागा नाही. हा द्वेष हिंदू, मुस्लिम किंवा ज्यूंपैकी कोणाही विरोधात असो… तुमचा धर्म किंवा राष्ट्रीयत्व कोणतेही असले, तरी आपण सर्वांनी कोणत्याही व्यक्तीविरुद्ध होणाऱ्या कट्टरता आणि भेदभावाच्या विरोधात खांद्याला खांदा लावून उभे राहिले पाहिजे. प्रत्येकाने या विषयाकडे गंभीरतेने लक्ष देणे गरजेचे आहे. ‘द इकॉनॉमिक्स टाइम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या वर्णद्वेषी वक्तव्याचा संसदेत निषेध
दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला राजा कृष्णमूर्ती आणि इतर डमोक्रॅटिक खासदारांनी अमेरिकन संसदेत एक निषेध प्रस्ताव मांडला होता. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानी आणि चिनी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या वर्णद्वेषी वक्तव्यांचा प्रचार केल्याचा आरोप या प्रस्तावात करण्यात आला होता. खासदार राजा कृष्णमूर्ती, टेड लिऊ आणि प्रमिला जयपाल यांनी मांडलेल्या या प्रस्तावात ट्रम्प यांच्या ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टचा उल्लेख करण्यात आला होता.
रेडिओ होस्ट मायकेल सॅव्हेज यांच्या एका वादग्रस्त विधानाचा ट्रम्प यांनी प्रसार केला होता. यात अमेरिकेत जन्मताच मिळणाऱ्या नागरिकत्वाच्या कायद्यावर टीका करण्यात आली होती. सदर पोस्टमध्ये हिंदुस्थान आणि चीनबद्दल अत्यंत अपमानास्पद भाषा वापरली गेली होती. तसेच स्थलांतरितांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते आणि हिंदुस्थानी व अमेरिकन-चिनी नागरिकांबद्दलचे चुकीचे पूर्वग्रह पसरवण्यात आले होते. या प्रस्तावाला खासदार श्री ठाणेदार, सुहास सुब्रमण्यम, अमि बेरा, ग्रेस मेंग आणि जुडी चू या इतर खासदारांनीही पाठिंबा दिला होता.
Comments are closed.