सीमेवर शांतता राखण्यावर एकमत
भारत-चीन देशांच्या सेनाधिकाऱ्यांमध्ये चर्चा : सातत्याने संपर्कात राहण्यावरही सहमती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत आणि चीन यांच्यात कॉर्प्स कमांडर पातळीवर नुकतीच चर्चा झाली आहे. ही चर्चा समाधानकारक पद्धतीने पार पडली असून सीमेवर शांतता राखणे आणि सातत्याने संपर्कात राहणे या दोन महत्वाच्या मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये एकमत झाले आहे, अशी माहिती चर्चेनंतर प्रसिद्ध केलेल्या पत्रकात देण्यात आली आहे.
ही चर्चा मोल्डो-चुशुल या सीमेवरील स्थानी भारताच्या प्रदेशात झाली. हे स्थान भारत आणि चीन यांच्यातील लडाख प्रदेशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आहे. चर्चा सौहार्दाच्या वातावरणात पार पडली असून या चर्चेत महत्वाच्या मुद्द्यांवर सखोल आणि सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. भारत-चीन यांच्यातील पश्चिम भागाच्या सीमाप्रदेशासंबंधी ही चर्चा होती, अशी माहिती चीनकडून देण्यात आली.
साडेतीन वर्षांचा तणाव
2020 मध्ये भारत आणि चीन यांच्यात लडाख सीमेवर संघर्ष निर्माण झाला होता. त्यनंतरची साडेतीन वर्षे दोन्ही देशांच्या सेना या भागात एकमेकींच्या समोर उभ्या होत्या. या काळात दोन्ही देशांमधील चर्चा आणि राजकीय संपर्क पूर्णपणे थांबला होता. तथापि, त्याच्यानंतर संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्यात आला. दोन्ही देशांच्या सेनांनी संघर्षपूर्व स्थितीत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोन्ही देशांच्या पुढे आलेल्या सेना त्यांच्या मूळ स्थानी मागे गेल्या. आजही ही स्थिती राहिलेली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव निवळला असून चर्चा प्रक्रियेलाही प्रारंभ झाला आहे. दोन्ही देशांमधील व्यापक चर्चा प्रक्रियेचा एक भाग म्हणून ही चर्चा करण्यात आली, अशी माहिती चीनी सेनेच्या प्रवक्त्याने दिली आहे.
भारताकडून तत्काळ दुजोरा नाही
भारताने मात्र, अशी चर्चा झाल्याच्या वृत्ताला तत्काळ दुजोरा दिलेला नाही. मात्र, चर्चा झाल्याचे चीनचे प्रतिपादन भारताने नाकारलेलेही नाही. तथापी, गेल्या काही महिन्यांमध्ये भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे नेते क्षी जिनपिंग यांच्यात थेट चर्चा झाली आहे. ही चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या चीनच्या दौऱ्यात झाली होती. या भेटीत सीमेवरील शांतता प्रक्रियेसंबंधीही व्यापक विचारविनिमय करण्यात आला होता, असे प्रतिपादन चीनी संरक्षण विभागाने पेले आहे. सध्या दोन्ही देशांमधील परस्पर संबंध स्थिर पातळीवर आहेत.
थेट विमानसेवेचा निर्णय
नुकताच भारत आणि चीन या दोन्ही देशांनी एकमेकांच्या शहरांमध्ये थेट प्रवासी विमानसेवांना प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा 2020 मधील संघर्षानंतर थांबविण्यात आली होती. आता या सेवेचा पुन्हा प्रारंभ करण्यात आल्याने दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे. परस्पर व्यापारातही वाढ झाली आहे. भारताकडून चीनला होणाऱ्या निर्यातीचे प्रमाणही गेल्या तीन महिन्यांमध्ये 22 टक्के वाढले आहे. भारतावर अमेरिकेने लावलेल्या 50 टक्के व्यापार शुल्काचा निषेध चीनने केला होता. झपाट्याने परिवर्तीत होत असलेल्या सध्याच्या परिस्थितीत भारत आणि चीन यांच्यातील संबंधांचे स्वरुपही नव्याने निर्धारित केले जात आहे. दोन्ही देशांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होत असून ही प्रक्रिया दोन्ही देशांनी प्रयत्नपूर्वक बळकट केली पाहिजे, असे मत अनेक आंतरराष्ट्रीय तज्ञ आणि माजी मुत्सद्द्यांनी व्यक्त केले आहे.
सावधानता आवश्यक…
भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारणे हे दोन्ही देशांच्या हितांच्या दृष्टीने आवश्यक आहे. तथापि, संबंधांचा आजवरचा इतिहास लक्षात घेता, भारताने सावध राहण्याची आवश्यकता आहे. चीनने भारताच्या काही भागावर आपला अधिकार सांगितला आहे, ही महत्वाची बाब दुर्लक्षित होऊ नये, असे तज्ञांचे मत आहे.
Comments are closed.