पंतप्रधान मोदीविरूद्ध कट रचला
कॅनडामध्ये खलिस्तानवाद्यांची योजना झाली उघड
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कॅनडामध्ये अचानक आंदोलन करण्याचे कारस्थान तेथील खलिस्तानवाद्यांनी रचले असल्याची माहिती समोर येत आहे. ते जी-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडाच्या दौऱ्यावर गेले आहेत. ही परिषद कॅनडातील कॅनानासकिसमध्ये अल्बर्टा येथे होत आहे. तेथे गुप्तपणे अनेक खलिस्तानवादी जमले असल्याची माहिती कॅनडाच्या गुप्तचरांनी दिली आहे. हे आंदोलन शांततापूर्ण असेलच असे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धोका करण्याचा प्रयत्नही केला जाऊ शकतो, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
जी-7 नेत्यांच्याविरोधात अशा आंदोलनाना अधिकृत अनुमती दिली जात नाही. त्यामुळे या खलिस्तानवाद्यांनी अचानकपणे आंदोलन आणि निदर्शने करण्याची योजना केल्याची माहिती उघड झाली आहे. कॅनडातील काही पत्रकारांनीही हे कारस्थान समोर आणले आहे. खलिस्तानवाद्यांचा एक गट शनिवारीच अल्बर्टा येथे पोहचला आहे, असे वृत्त डॅनियल बोर्डमान यांनी दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या चार दिवसांच्या आणि तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. सायप्रसचा दौरा आटोपून ते कॅनडाला पोहचले आहेत. जी-7 परिषदेनंतर ते क्रोएशियाचा दौरा करणार आहेत, अशी माहिती दिल्लीतील त्यांच्या कार्यालयाने दिली आहे.
खलिस्तानवाद्यांचा संताप
कॅनडातील परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामुळे खलिस्तानवाद्यांचा संताप झाला आहे. त्यामुळे त्यांनी अचानकपणे त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याची योजना सज्ज केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर भारताच्या राष्ट्रधजाचा अवमान करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. काही खलिस्तानवाद्यांनी भारतीय राष्ट्रध्वज पायदळी तुडविण्याचे कृत्य केले असून नंतर त्यांनी तो ध्वज फाडल्याचे दिसून आले आहे. ही घटना सोमवारची आहे.
प्रक्षोभक संदेश
शीख फॉर जस्टीस या भारतात बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेच्या काही म्होरक्यांनी आणि हस्तकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी एक प्रक्षोभक संदेश पसरविला आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे’ असा हा संदेश आहे. त्यामुळे खलिस्तानवादी केवळ आंदोलन करणार आहेत, की आणखी काही गंभीर कृती करण्याचा त्यांचा विचार आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सुरक्षा कडेकोट ठेवण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात गाणे
खलिस्तानवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एक गाणेही तयार केले आहे. या गाण्यातील काही ओळी प्रक्षोभक आहेत. कॅनडात अशा भाषेला अनुमती दिली जात नाही. तथापि, हे गाणे प्रसारित करण्यात येत आहे. ते कायद्याच्या चौकटीत आहे, असे खलिस्तानवाद्यांचे म्हणणे आहे, असे बोर्डमान यांचे वृत्त आहे.
पत्रकारावर हल्ला
कॅनडात खलिस्तानवाद्यांनी पत्रकारावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. स्वतंत्र पत्रकार मोचा बेझिरगन असे या पत्रकाराचे नाव असून त्याच्यावर व्हँक्युव्हर येथे सोमवारी हल्ला करण्यात आला होता. त्यांना धमकीही देण्यात आली होती. बेझिरगन यांनी अनेकदा खलिस्तानवाद्यांच्या कुप्रवृत्तीवर टीका केली आहे. त्यामुळे त्यांना लक्ष्य करण्यात आले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
खलिस्तानवाद्यांचा प्रभाव ओसरतोय
कॅनडातील खलिस्तानवाद्यांचा प्रभाव ओसरताना दिसत आहे, असे बोर्डमान यांचे म्हणणे आहे. जस्टीन ट्रूडो यांच्या काळात त्यांचे सरकार खलिस्तानवाद्यांवर अवलंबून होते. आता मार्क कर्नी यांची तशी स्थिती नाही. म्हणूनच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले. हे प्रभाव ओसरल्याचे लक्षण आहे.
Comments are closed.