झाडांची छाटणी करायची असेल तर वन्यजीव संस्थेचे प्रमाणपत्र घ्या ! वनविभागाचे फर्मान, ठाण्यातील पक्ष्यांच्या मृत्यूनंतर यंत्रणा सतर्क

झाडे किंवा झाडांच्या फांद्या छाटताना त्यावर पक्ष्यांचा अधिवास आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी वन्यजीव संस्थेचे प्रमाणपत्र ठेकेदारांना घ्यावे लागणार आहे. तसे फर्मान वनविभागाने काढले आहे. घोडबंदरमधील ऋतू एन्क्लेव्ह सोसायटीच्या आवारात बेदरकारपणे झाडांची छाटणी केल्याने तब्बल 70 पक्ष्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर वनविभाग आणि पालिकेचे वृक्षप्राधिकरण विभाग सतर्क झाले आहे.
घोडबंदरच्या आनंदनगर परिसरात ऋतू एन्क्लेव्ह सोसायटीच्या आवारात खासगी ठेकेदाराकडून गुरुवारी दुपारी झाडांची छाटणी सुरू होती. या छाटणीवेळी शेकडो पक्ष्यांची घरटी खाली पडली. अंडी फुटली आणि त्यात 70 हून अधिक पक्ष्यांना आपला जीव गमावावा लागला, तर 28 पक्षी जखमी झाले. त्यापैकी पाच पक्षी दुसऱ्या दिवशी दगावले. यामध्ये बगळे व कावळ्यांचा समावेश होता. याप्रकरणी झाडांची छाटणी करणाऱ्या खासगी ठेकेदार व ऋतू एन्क्लेव्ह सोसायटीचे सचिव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचे जबाब नोंदवले आहेत. त्यांना नोटीस बजावली असून पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली आहे.
ही घटना अत्यंत दुर्दैवी असून भविष्यात अशा पद्धतीने झाडांची छाटणी करताना आजूबाजूच्या परिसरातील वन्यजीव संस्था अथवा पर्यावरणप्रेमींचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र सादर करावे. त्यानंतरच वृक्ष छाटणी करण्याची परवानगी संबंधितांना दिली जाईल. याबाबत ठाणे महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण विभागाशीही चर्चा सुरू आहे. – दिनेश देसले, वनाधिकारी
Comments are closed.