कोस्टल रोडवर करा नॉनस्टॉप प्रवास, देखभालीसाठी पालिका कंत्राटदार नेमणार; 84 कोटी खर्च करणार

मरीन ड्राइव्ह ते वांद्रे–वरळी कोस्टल रोडची देखभाल, त्याचे परिचालन यासाठी आता पुढील पाच वर्षे कंत्राटदार नेमण्यात येणार आहे. अग्नी सुरक्षा, आपत्कालीन सेवा, सीसीटीव्ही, बोगद्यातील सुविधा, स्काडा प्रणालीची देखभाल या कामांची जबाबदारी कंत्राटदारावर राहणार आहे. यासाठी निविदा काढण्यात आली आहे. पालिका सुमारे 84 कोटी इतका खर्च करणार आहे.

कोस्टल रोड हा मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे वाहतूककोंडी दूर होऊन मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार आहे. कोस्टल रोड प्रकल्पाची देखभाल करण्यासाठी महापालिकेने आता कंत्राटदार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या देखभालीमध्ये रस्ते देखभालीचा समावेश आहे. तर लेन मार्किंग, सीसीटीव्हीची देखभाल, टोइंग व्हॅन, अग्निशमन यंत्रणा, व्रॅश बॅरियर आदींचा समावेश आहे. सागरी किनारा मार्गांवर होणाऱया अन्य कामासाठीचा येणारा खर्च कमी करण्यावर पालिकेने सध्या भर दिला आहे.

70 हेक्टरवर हरितक्षेत्र तयार करण्यासाठी महापालिकेला साधारण 400 कोटी रुपयांपर्यंत खर्च येणार आहे. त्यामुळे हा खर्च टाळण्यासाठी महापालिकेने सीएसआर निधीतून ते विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदा काढून स्वारस्य अभिव्यक्तीही मागवण्यात आली आहे, तर खर्च टाळण्यासाठी या मार्गांवरील दुभाजकांचे सुशोभीकरण केले जात आहे. मात्र हा खर्च टाळण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आता महापालिकेला देखभालीचा खर्च करावा लागणार आहे.

कंत्राटदाराला दररोज एक लाखाचा दंड

पावसाळ्यापूर्वीची आवश्यक देखभाल 15 एप्रिलपूर्वी न झाल्यास काम पूर्ण होईपर्यंत कंत्राटदारावर प्रतिदिन एक लाख रुपये इतका दंड आकारण्यात येणार आहे.  पावसाळय़ापूर्वी यंत्रणा कोलमडल्यास ती दरवर्षी 1 मेपूर्वी पूर्ण करून घेणे आवश्यक राहील. ते वेळेत पूर्ण न झाल्यास प्रतिदिन एक लाख रुपये दंड कंत्राटदारावर आकारला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Comments are closed.