राहुल गांधींच्या छायाचित्रांवर वादविवाद
सॅनिटरी पॅड खोक्यांवर छायाचित्र, टीकेचा भडिमार
वृत्तसंस्था/ पाटणा
काँग्रेसच्या बिहार शाखेच्या एका वादग्रस्त कृतीमुळे मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेसच्या बिहार शाखेने या राज्यातील आगामी विधानसभा निवणूक दृष्टीसमोर ठेवून काही उपक्रम हाती घेतले आहेत. गरीब महिलांना सॅनिटरी पॅडस् देणे या उपक्रमाचा त्यांच्यात समावेश आहे. मात्र, गरजवंत महिलांना दिल्या जाणाऱ्या सॅनिटरी पॅडच्या बॉक्सवर राहुल गांधी यांचे छायाचित्र मुद्रित करण्यात आल्याने प्रचंड गदारोळ उठला असून काँग्रेसवर टीकेचा भडिमार होत आहे.
गरीब महिलांना सॅनिटरी पॅडचे बॉक्स देण्याच्या या योजनेला बिहार काँग्रेसने प्रियदर्शिनी उडान योजना असे नाव दिले आहे. या योजनेद्वारे महिलांमध्ये मासिक पाळीच्या काळात पाळावयाच्या स्वच्छतेविषयी जागरुकता निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तथापि, योजनेचा उद्देश योग्य असला तरी तिला राजकारणाचा रंग दिल्याने काँग्रेसवर शरसंधान होत आहे.
राहुल गांधी यांचे छायाचित्र
गरीब महिलांना दिल्या जाणाऱ्या सॅनिटरी पॅड बॉक्सवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे छायाचित्र छापण्यात आल्याने ही योजना वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ही योजना केवळ निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून आणण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधींचे छायाचित्र छापण्यात आले आहे. हा महिलांचा अवमान आहे, अशी टीका आता केली जात आहे. नेत्यांची छायाचित्रे कोठे छापावीत आणि कोठे छापू नयेत, यासंबंधी काही ताळतंत्र असावे, अशाही सूचना केल्या जात आहेत.
सोशल मीडियावर टीका
काँग्रेसची ही योजना आणि राहुल गांधी यांचे छायाचित्र असलेले बॉक्सेस सध्या सोशल मिडियावरही प्रसिद्ध झाले आहेत. अनेकांनी या योजनेची प्रशंसा केली आहे. तथापि, या योजनेचा निवडणुकीशी संबंध जोडण्याचे काय कारण आहे असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांची जाहिरात अशा प्रकारे करण्यावरही अनेकांनी आक्षेप नोंदविला. प्रत्येक स्थानी राजकारण करण्याच्या सवयीमुळे राजकीय पक्षांचेच असे हसे होते, याचे हे उदाहरण असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले आहे. इतरही अनेक मते सोशल मिडियावर येत आहेत.
भारतीय जनता पक्षाची टीका
सॅनिटरी पॅड बॉक्सवर राहुल गांधी यांचे छायाचित्र छापून काँग्रेसने बिहारच्या महिलांना अवमान केला आहे. यामुळे काँग्रेस पक्ष कसा महिलाविरोधी आहे, हे दिसून येते. काँगेसला महिलांचे प्रबोधन करण्यात काहीही स्वारस्य नाही. त्यांना केवळ राहुल गांधी आणि आपला पक्ष यांचे ढोल बडवायचे आहेत. गांधी यांचे छायाचित्र कोठे छापावे, याचे या पक्षाचे भानही सुटलेले आहे. बिहारच्या महिला आता आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि महागठबंधन यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी पत्रकारांशी बोलताना शुक्रवारी केली आहे. योजना चांगली, पण क्रियान्वयनाची पद्धती हास्यास्पद अशी टिप्पणी काही मान्यवरांनी केली. काँग्रेसची प्रतिक्रिया मात्र अद्याप समजलेली नाही.
Comments are closed.