शेन वॉर्न आणि ब्रॅड हॉगचा विक्रम एकाच वेळी मोडत, कूपर कोनोलीची ऑस्ट्रेलियासाठी शानदार कामगिरी!

मॅकेच्या ग्रेट बॅरिअर रीफ अरेना मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलियन स्पिनर कूपर कोनोलीच्या (Cooper Connolly) फिरकीची जादू पाहायला मिळाली. फक्त पाचव्या वनडेत खेळताना कोनोलीनं “पंजा” (5 विकेट) झळकावला आणि ऑस्ट्रेलियाला त्यांच्या वनडे इतिहासातील दुसरा सर्वात मोठा विजय मिळवून दिला.

ऑस्ट्रेलियाने आधी फलंदाजी करताना तब्बल 431 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर कोनोलीच्या फिरकीसमोर आफ्रिकन फलंदाज पूर्णपणे गंडले आणि फक्त 155 धावांवर गडी बाद झाले. कूपर कोनोलीनं 6 षटकांत फक्त 22 धावा देत 5 विकेट घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाला तब्बल 276 धावांनी मोठा विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. याचवेळी कोनोलीनं अनेक विक्रमही मोडले.

कूपर कोनोलीनं 6 षटकांत 22 धावा देत 5 विकेट घेतल्या जे वनडे क्रिकेटमध्ये एखाद्या ऑस्ट्रेलियन स्पिनरचे सर्वोत्तम बॉलिंग फिगर्स आहेत. याआधी हा विक्रम ब्रॅड हॉग यांच्या नावावर होता (2005 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 10 षटकांत 32 धावा देऊन 5 विकेट). त्यानंतर यादीत शेन वॉर्न आहेत. त्यांनी 1996 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 9.3 षटकांत 33 धावा देत 5 विकेट घेतल्या होत्या.

कूपर कोनोलीनं फक्त 22 वर्षे आणि 2 दिवस वयात “पंजा” झळकावला आणि तो वनडेत ऑस्ट्रेलियाकडून 5 विकेट घेणारा सर्वात तरुण गोलंदाज ठरला. याआधी हा विक्रम क्रेग मॅकडरमॉट यांच्या नावावर होता, ज्यांनी 1987 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 22 वर्षे आणि 204 दिवस वयात 5 विकेट घेतल्या होत्या. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर मिचेल स्टार्क आहे, ज्याने 2012 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 22 वर्षे 211 दिवस वयात फायव्हर घेतला होता.

Comments are closed.