ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात ‘कोरोना वॉर्ड’; कोपरीत तीन रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर, 40 कोविड बेड सज्ज

हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसने महाराष्ट्रात एण्ट्री केली आहे. मुंबईपाठोपाठ कोविडने ठाण्यात धोक्याची घंटा वाजवली असून कोपरीत तीन रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. या महामारीचा सामना करण्यासाठी सिव्हिल रुग्णालयात 40 बेडचा ‘कोविड वॉर्ड’ सज्ज करण्यात आला आहे.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर आता ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातही कोविडचे तीन रुग्ण सापडले आहेत. हे रुग्ण कोपरीतील असून त्यांची लक्षणे सौम्य आहेत. त्यामुळे दोन रुग्णांवर घरात आणि एका रुग्णावर मुलुंडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यानंतर महापालिका आरोग्य यंत्रणा अॅक्शन मोडवर आली आहे. ठाणे सिव्हिल रुग्णालयात 40 खाटांचा विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. हा कक्ष पूर्णपणे वातानुकूलित असून त्यामध्ये आवश्यक ती सर्व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध आहेत. डॉक्टर, नर्सेस आणि सहाय्यक कर्मचारी यांची स्वतंत्र नियुक्तीही करण्यात आली आहे. याशिवाय रुग्णांच्या चाचण्या, विलगीकरण आणि औषधोपचारासाठी स्वतंत्र सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. आरोग्य यंत्रणेने सर्व नागरिकांना पुन्हा एकदा मास्कचा वापर करण्याचे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचे, हात स्वच्छ ठेवण्याचे आणि लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करून उपचार घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांची सतर्कता आणि सहकार्य हेच कोरोनाच्या संभाव्य लाटेला थोपवू शकते.
डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक

Comments are closed.