जगन्नाथ मंदिरात 48 वर्षांनंतर होणार रत्नांची मोजणी

आरबीआयच्या देखरेखीत 25 मार्चपासून गणना : रजिस्टर्ड सुवर्णकारही उपस्थित राहणार

वृत्तसंस्था/ पुरी

पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराच्या रत्न भंडाराची बहुप्रतीक्षित गणना आणि यादी तयार करण्याची प्रक्रिया अखेर सुरू होणार आहे. ओडिशा सरकारने 25 मार्च रोजी दुपारी 12.12 ते 1.45 वाजण्याचा शुभ मुहूर्त निश्चित केला आहे.

‘रत्न भंडार’ भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या मूल्यवान आभूषणांचा खजिना आहे. 1978 च्या गणनेनुसार येथे 128.38 किलो सोने आणि 221.53 किलो चांदीचे दागिने आहेत. ही गणना 72 दिवसांपर्यंत चालली होती.

यंदाच्या रत्न भंडार गणनेच्या पूर्ण प्रक्रियेची फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी केली जाणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यावर सहमती दर्शविली आहे. तर राष्ट्रीयकृत बँक नोंदणीकृत सुवर्णकार उपलब्ध करणार आहे. यंदाची ही गणना किती दिवस चालेल हे आताच सांगणे घाईचे ठरेल. राज्य सरकार दोन रत्न तज्ञही उपलब्ध करणार असून ते दागिन्यांमध्ये जडविलेल्या मूल्यवान रत्नांची पारख करतील. बाहेरील रत्न भंडारात भगवानाच्या दैनंदिन वापराचे दागिने ठेवले जातात अशी माहिती मुख्य प्रशासक अरविंद पाढी यांनी दिली आहे.

खजिन्याला रोज चावी लावणार मॅजिस्ट्रेट

दागिन्यांच्या मोजणीसाठी राज्य सरकारने आदर्श कार्यान्वयन प्रक्रिया जारी केली आहे. तीन सदस्यीय समिती प्रक्रियेवर नजर ठेवणार आहे. सोने, चांदी आणि अन्य मूल्यवान दागिन्यांसाठी वेगवेगळे बॉक्स असतील. 10 लोक दागिन्यांना बॉक्समध्ये ठेवतील. मॅजिस्ट्रेट खजिन्यातून रोज रत्नभंडाराची चावी घेऊन येतील. प्रक्रिया पूर्ण होताच त्याच दिवशी ती परत जमा करतील.

2024 मध्ये हरवली होती चावी

ओडिशा उच्च न्यायालयाने 2018 मध्ये राज्य सरकारला रत्न भंडार उघडण्याचे निर्देश दिले होते. परंतु 4 एप्रिल 2018 रोजी न्यायालयाच्या आदेशावर 16 सदस्यीय पथक रत्न भंडाराच्या दालनापर्यंत पोहोचल्यावर त्यांना रिकामी हाताने परतावे लागले होते, कारण त्यावेळी रत्नभंडाराची चावी हरवल्याचा दावा करण्यात आला होता. चावी न मिळाल्याने गोंधळ झाला होता ज्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी 4 जून 2018 रोजी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले होते. चौकशी समितीने 29 नोव्हेंबर 2018 रोजी चावीशी निगडित स्वत:चा अहवाल राज्य सरकारला सोपविला होता. परंतु सरकारने तो कधीच उघड केला नाही आणि चावीचाही थांगपत्ता लागू शकला नव्हता.

मंदिर समितीची शिफारस

2018 मध्ये तत्कालीन कायदामंत्री प्रताप जेना यांनी विधानसभेत रत्न भंडारमध्ये 12,831 हून अधिक सोन्याचे दागिने असल्याची माहिती दिली होती. तसेच या दागिन्यांमध्ये मूल्यवान रत्नं जडविलेली आहेत. याचबरोबर 22,153  चांदीची भांडी अन् इतर सामग्री आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात जगन्नाथ मंदिर व्यवस्थापन समितीने राज्य सरकारला रत्न भंडार 2024 च्या वार्षिक रथयात्रेदरम्यान उघडण्यात यावा अशी शिफारस केली होती.

Comments are closed.