साई-फाय: कोरोना जेएन .1
>> प्रसाद तम्हंकर ([email protected]))
प्रमुख आशियाई देशांमध्ये, विशेषत हॉंगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोना व्हायरसने पुन्हा डोके वर काढल्याने हिंदुस्थानसह अनेक देशांची चिंता वाढलेली आहे. सिंगापूरमध्ये आरोग्य मंत्रालयाने 27 एप्रिल ते 3 मे 2025 या आठवडय़ात एकूण 14,200 नवीन प्रकरणे नोंदवली होती, तर मागील आठवडय़ात या प्रकरणांची संख्या 11,100 वर गेली होती.
बहुरूपी कोरोनाच्या या नव्या अवताराने चीनमध्येदेखील गोंधळ घालायला सुरुवात केली आहे. आरोग्य तज्ञांच्या सांगण्यानुसार कोरोनाच्या या वाढत्या उद्रेकाला कोरोनाच्या ओमिक्रॉन या प्रकारातील सबव्हेरियंट JN.1 हा जबाबदार आहे.
काही आरोग्य तज्ञांच्या मते JN.1 हा काही नवा किंवा अनोळखी विषाणू नाही. त्याची ओळख एक वर्षापूर्वी पटवण्यात आली असून या विषाणूबद्दल सर्व माहिती, त्याचे चांगले वाईट परिणाम याची माहिती आरोग्य संस्थांकडे जमा आहे. कोरोनाच्या कुटुंबात हजारो सदस्य असले तरी त्यातील फक्त सात सदस्य मानवासाठी धोकादायक आहे. सध्या धुमाकूळ घालत असलेला JN.1 हा उपलब्ध असलेल्या पुराव्यानुसार आणि अभ्यासानुसार फारसा घातक नाही. या विषाणूची लागण झाल्यास सर्दीसारखे साधे आजार उद्भवू शकतात. त्यामुळे घाबरून जाण्याची अथवा चिंताग्रस्त होण्याची सध्या तरी आवश्यकता नाही. कोरोना विषाणूच्या या नव्या प्रकाराची लक्षणेदेखील ओमिक्रॉनपेक्षा फारशी वेगळी नाहीत. या नव्या विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांमध्ये घसा खवखवणे, थकवा, डोकेदुखी आणि खोकला इत्यादी लक्षणे दिसून येतात, तर काही रुग्णांमध्ये डोकेदुखीबरोबर अतिसाराचीदेखील लक्षणे दिसून येतात. महत्त्वाचे म्हणजे ही लक्षणे अनेक लोकांच्या निरोगीपणावर आणि रोगप्रतिकारक शक्तीवरदेखील अवलंबून असतात.
JN.1 च्या प्रादुर्भावाने सध्या कोणताही गंभीर आजार पसरत नसला तरी त्याचा ज्या वेगाने प्रसार होत आहे ते बघता आरोग्य तज्ञ काळजीत पडलेले आहेत.
ओमिक्रॉनचा नवा व्हेरियंट JN1 आणि त्याचे सबव्हेरियंट LF7 आणि NB1.8 हे या वेळच्या कोरोना प्रादुर्भावाचे मूळ कारण आहे. JN.1 व्हेरियंट ओमिक्रॉन BA.2.86 वंशातला आहे. जॉन्स हॉपकिन्स मेडिसिनच्या सांगण्यानुसार, या व्हेरियंटचा शोध पहिल्यांदा ऑगस्ट 2023 मध्ये लागला होता. सध्या लागण झालेल्या काही रुग्णांना दवाखान्यात दाखल करायला लागल्याने जास्त चिंता पसरली होती. त्यामुळे कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांनी अधिक काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
दुसरीकडे आरोग्य तज्ञांचा एक गट कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल चिंता व्यक्त करत असताना हाँगकाँगमध्ये 30 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचा हवाला देत आहेत. पूर्वीच्या कोरोना विषाणूपेक्षा हा नवा विषाणू अधिक घातक असल्याचे कोणतेही पुरावे समोर आलेले नसले तरी जनतेने काळजी घेण्याचे आवाहन या गटाने केले आहे. पूर्वी ज्यांनी कोरोनाची लस घेतलेली आहे, अशा लोकांनादेखील या नव्या विषाणूच्या प्रादुर्भावाचा धोका आहे. पूर्वी घेतलेल्या लसीमुळे शरीरात तयार झालेल्या अँटिबॉडीज या नव्या विषाणूपुढे तेवढय़ा प्रभावी ठरत नाहीत याकडेदेखील तज्ञांच्या या गटाने लक्ष वेधले आहे. XBB.1.5 मोनोव्हॅलेंट बूस्टर डोस हा JN1 प्रकाराशी लढण्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले जात आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या मते, ही बूस्टर लस विशेषत ओमिक्रॉनच्या XBB1.5 सबव्हेरियंटसाठी तयार करण्यात आली आहे. यामुळे शरीरात अँटिबॉडीज वाढतात. या डोसमुळे JN1 मुळे होणारे आजार 19 टक्के ते 49 टक्क्यांपर्यंत रोखता येतात.
जगभरात कोरोनाची चिंता वाढत असताना हिंदुस्थानातदेखील तामीळनाडू, मुंबई, महाराष्ट्र, केरळ अशा प्रमुख राज्यांत प्रादुर्भाव वाढू लागलेला आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात नुकतीच एक विशेष बैठक बोलावली होती. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार 19 मेपर्यंत हिंदुस्थानात कोरोनाचे 257 सक्रिय रुग्ण आढळलेले आहेत. देशाच्या एकूण लोकसंख्येचा विचार करता ही संख्या अतिशय कमी आहे. आढळलेल्या रुग्णांपैकी फारसे कोणी गंभीर अवस्थेत नाही. त्यामुळे भयभीत होण्याची आवश्यकता नसल्याचेदेखील मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
नवीन कोव्हिड -१ W व्हेरिएंट जेएन .१ आशियातील चिंता वाढवते: आपल्याला काय माहित असणे आवश्यक आहे
Comments are closed.