38व्या वर्षी कायरन पोलार्डची आतषबाजी, CPL मध्ये ठोकली सर्वात वेगवान फिफ्टी, VIDEO

वेस्ट इंडिजचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डने कॅरिबियन प्रीमियर लीग (सीपीएल) 2025 मध्ये फलंदाजीने धुमाकूळ घातला आहे. ट्रिनबागो नाईट रायडर्सचा भाग असलेल्या पोलार्डने गयाना अमेझॉन वॉरियर्सविरुद्ध तुफानी अर्धशतक झळकावले. त्याने 6 सप्टेंबर रोजी गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर 18 चेंडूत नाबाद 54 धावा केल्या, ज्यामध्ये पाच चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. तो सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला.

38 वर्षीय पोलार्डने फक्त 17 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. सीपीएलमधील हे त्याचे सर्वात जलद अर्धशतक आहे. एकूण यादीतील हे संयुक्तपणे तिसरे सर्वात जलद अर्धशतक आहे. एविन लुईस आणि डेव्हिड मिलर यांनीही प्रत्येकी 17 चेंडूत अर्धशतक झळकावले आहेत.

सीपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम आंद्रे रसेलच्या (14 चेंडूत) नावावर आहे. त्याच्या पाठोपाठ जेपी ड्युमिनी (15 चेंडूत)चा क्रमांक लागतो. ट्रिनबागो नाईट रायडर्सच्या डावाच्या शेवटच्या षटकात पोलार्डने रोमारियो शेफर्डला चोपले. 20व्या षटकाच्या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर त्याने सलग षटकार मारले आणि नंतर पाचव्या चेंडूवर चौकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. शेवटच्या चेंडूवर त्याने चौकारही मारला. पोलार्डने सीपीएलच्या चालू हंगामातील आपले तिसरे अर्धशतक झळकावले आहे. पोलार्डने 1 सप्टेंबर रोजी सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्सविरुद्ध 29 चेंडूत 65 धावा आणि 23 ऑगस्ट रोजी सेंट लुसिया किंग्जविरुद्ध 29 चेंडूत 65 धावा केल्या.

तथापि, पोलार्डची धमाकेदार खेळी पुन्हा वाया गेली. 167/5 धावा करूनही ट्रिनबागो नाईट रायडर्सना तीन विकेट्सने पराभव पत्करावा लागला. गयाना अमेझॉन वॉरियर्सने एक चेंडू शिल्लक असताना विजयाचा झेंडा फडकावला. संघाकडून शाई होपने सर्वाधिक धावा केल्या. होपने 46 चेंडूत 54 धावा केल्या. ज्यात त्याने तीन चौकार आणि तेवढेच षटकार मारले. शिमरॉन हेटमायरने 30 चेंडूत दोन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 49 धावा केल्या. ड्वेन प्रिटोरियसने 14 चेंडूत नाबाद 26 धावा केल्या, ज्यात तीन षटकारांचा समावेश होता. तर गुडाकेश मोतीने विजयी धावा केल्या. 6 चेंडूत पाच धावा करून तो नाबाद परतला.

Comments are closed.