दिव्यांगांची क्रिकेट स्पर्धा आजपासून

शारीरिक अडचणींना न जुमानता क्रिकेटप्रेम मनात जोपासणाऱ्या दिव्यांग खेळाडूंना एक अनोखे व्यासपीठ मिळणार आहे. ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर फिजिकली चॅलेंज या संस्थेच्या वतीने 5 ते 7 नोव्हेंबरदरम्यान एलआयसी ट्रॉफी या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. ही स्पर्धा पोलीस जिमखाना, इस्लाम जिमखाना आणि हिंदू जिमखाना येथे पार पडणार असून देशभरातील 16 राज्यांचे संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. यात यजमान मुंबईसह महाराष्ट्र जम्मू-कश्मीर, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, सौराष्ट्र, बडोदा, कर्नाटक, केरळ, पुद्दुचेरी, तामीळनाडू, विदर्भ, झारखंड आणि पश्चिम बंगाल हे राज्य या स्पर्धेत उतरतील.

टी-20 स्वरूपातील ही स्पर्धा खास 40 टक्के शारीरिकदृष्ट्या दिव्यांग खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमाला महाराष्ट्र राज्याचे क्रीडा उपसंचालक तसेच जी. टी. हॉस्पिटल आणि सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांचे सहकार्य लाभले आहे. आयोजक मंडळाच्या मते या स्पर्धेचे उद्दिष्ट दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन देऊन त्यांच्या आत्मविश्वासाला नवी दिशा देणे आहे. एलआयसी ट्रॉफी केवळ ट्रॉफी जिंकण्यापुरती मर्यादित नसून ती आहे त्या योद्ध्यांच्या जिद्दीचा, सामर्थ्याचा आणि आत्मविश्वासाचा उत्सव असेल.

Comments are closed.