पारनेरमध्ये वारकरी संप्रदायाला काळिमा, वासनांध कीर्तनकार महाराजाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

क्राईम न्यूज अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील ढवळीपूर गावात वारकरी संप्रदायाच्या लौकिकाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका कीर्तनकाराने (Kirtankar) अल्पवयीन मुलीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण (Sexual Assault) केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पारनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ (महाराज) (वय 38) याने एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मागील पाच वर्षांपासून धाक दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीला गरम लोखंडी पक्कडीने चटके देऊन अमानुष मारहाण केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. (Maharashtra Crime news)

यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ हा गेल्या पाच वर्षांपासून या मुलीवर अत्याचार करत होता. याबाबत मुलीच्या भावाने पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर अण्णासाहेब गुंजाळला पोलिसांनी रविवारी पहाटे चार वाजता बेड्या ठोकल्या असून त्याच्याविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने नराधम अण्णासाहेब गुंजाळला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले. त्यामुळे आता पोलीस चौकशीतून कोणती नवीन माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता आठवीत असल्यापासून हा प्रकार सुरू होता. आरोपी यशवंत थोरात हा पीडितेच्या शेजारीच राहत असल्याने दोन्ही कुटुंबांचे घरोब्याचे संबंध होते. पीडितेचा भाऊ आरोपीच्याच वारकरी शिक्षण संस्थेत सचिव म्हणून कार्यरत आहे. याचाच फायदा घेऊन आरोपीने 2021पासून पीडितेवर वाईट नजर ठेवली होती. मुलगी घरी एकटी असताना किंवा आरोपीच्या घरी कोणी नसताना त्याने वारंवार तिच्यावर बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले.

​पीडितेने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. ‘मी दोन हाफ मर्डर केलेले आहेत, जर कोणाला काही सांगितले तर तुझ्या आई-वडिलांना आणि भावाला मारून टाकीन’, अशी भीती तो घालत होता. कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी पीडितेने हा छळ मुकाट्याने सहन केला.

​घटनेचा थरार 10 मार्च 2026 रोजी शिगेला पोहोचला. आरोपीने पीडितेला फोन करून त्याच्या घरी बोलावले. तिने येण्यास नकार दिला असता, त्याने कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली. भीतीपोटी पीडिता त्याच्या घरी गेली असता, तू लवकर का आली नाहीस, असे विचारत आरोपीने तिला मारहाण करायला सुरुवात केली. आरोपीने तिला कॉम्प्युटर रूममध्ये नेऊन बांबूने व चापटीने बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, नराधम आरोपीने स्वयंपाकाची लोखंडी पक्कड गॅसवर गरम करून पीडितेच्या चटके दिले. या अमानुष कृत्यानंतरही त्याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला जाळून टाकेन, घरात एकही माणूस ठेवणार नाही, अशी धमकीही नराधमाने पीडितेला दिली.
च्या
​मारहाण आणि चटक्यांमुळे पीडितेला चालणेही कठीण झाले होते. 14 मार्च रोजी तिचा भाऊ घरी आला असता, तिला गंभीर अवस्थेत पाहून त्याने विश्वासात घेतले. मावस भावांच्या उपस्थितीत पीडितेने आपल्यावर झालेला पाच वर्षांचा अन्याय कथन केला. त्यानंतर पीडितेच्या भावाने पारनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पारनेर पोलिसांनी याप्रकरणी यशवंत एकनाथ थोरात विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात संताप व्यक्त होत असून, आरोपी यशवंत महाराज थोरात यांना पारनेर पोलिसांनी पहाटे चार वाजता अटक केली आहे या अशा ‘भोंदू’ महाराजावर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

आणखी वाचा

गुप्तधनाच्या नावाने खणलेल्या खड्ड्यात प्राध्यापकाला पुरलं, ‘क्राइम पेट्रोल’च्या स्टोरीलाही लाजवेल असा प्लॅन रचला पण अखेर पोलिसांच्या ताब्यात सापडलेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये नक्की काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.