गर्लफ्रेंडला रंग लावला म्हणून संतापला; बॉयफ्रेंडने आपल्या मित्राला संपवलं अन् अपघाताचा बनाव रचू
पाणीपत: होळीच्या दिवशी प्रेयसीला रंग लावल्याच्या क्षुल्लक वादातून एका २३ वर्षीय तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या (Crime News) करण्यात आल्याची घटना हरियाणातील पाणीपत येथे उघडकीस आली आहे. आरोपीने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने मित्राला रेल्वे रुळाला जिवंत बांधले आणि त्यानंतर अंगावरून ट्रेन गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला, मात्र पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे या खुनाचा छडा लावला आहे.(Crime News)
नेमकी घटना काय?
कालू (२३) असे मृत तरुणाचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी संजू, राहुल आणि विशाल या तीन आरोपींना अटक केली आहे. संजू हा या संपूर्ण कटाचा मास्टरमाइंड आहे. होळीच्या दिवशी कालूने संजूच्या प्रेयसीला रंग लावला होता, ज्याचा राग संजूच्या मनात होता. याच रागातून त्याने कालूचा काटा काढण्याचे ठरवले.(Crime News)
अशी रचली हत्येचा कट
जीआरपीचे पोलीस अधिकारी धर्मपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ही हत्या केली. घटनेच्या संध्याकाळी संजूने कालूला घराबाहेर बोलावले आणि तिघेही दारू पिण्यासाठी गेले. आरोपींनी स्वतः कमी दारू प्यायली आणि कालूला जास्त पाजली. तो पूर्णपणे नशेत झाल्यानंतर आरोपींनी त्याला रेल्वे रुळाजवळ नेले. तेथे संजूने कालूच्या गळ्यावर स्क्रू ड्रायव्हरने वार केले. तरीही तो मेला नाही, तेव्हा आरोपींनी त्याला जिवंत अवस्थेतच रेल्वे रुळाला बांधून टाकले. नशेत असल्याने कालू स्वतःचा बचाव करू शकला नाही आणि काही वेळातच अंगावरून ट्रेन गेल्याने त्याचे तुकडे झाले.
या घटनेच्या तपासात असे समोर आले आहे की, या दोघांमध्ये जुने वाद देखील होते. कालूने एकदा संजूची दुचाकी घेतली होती, जिचा अपघात झाला होता. या अपघाताचे पैसे कालूने संजूला दिले नव्हते, त्यावरूनही त्यांच्यात वाद सुरू होता.
पोलिसांनी असा लावला शोध
सुरुवातीला हा अपघात किंवा आत्महत्या असावी असा संशय होता. मात्र, कालूच्या मोबाईल लोकेशनचा डेटा आणि आरोपींच्या संशयास्पद हालचालींवरून पोलिसांना संशय आला. कडक चौकशी केल्यानंतर तिन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला.
तर एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, आपल्या प्रेयसीला होळीचा रंग लावल्याच्या कारणावरून कालू या २३ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यानंतर, हा प्रकार आत्महत्या असल्याचा बनाव रचण्यासाठी आरोपीने मृतदेह रेल्वे रुळावर फेकून दिला होता. सुरुवातीच्या तपासात ही एक दुर्घटना असल्याचे मानले जात होते, मात्र त्यानंतर जीआरपी (GRP) ने केलेल्या तपासात हा खून असल्याचे उघड झाले.
आणखी वाचा
Comments are closed.