फार्मा कंपनीचा झोनल मॅनेजर ठरला सायबर ब्लॅकमेलिंगचा बळी, मॉर्फ फोटो व्हायरलची धमकी देत घातला गं
गुन्हे बातम्या: सायबर गुन्हेगारांकडून अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून एका फार्मास्युटिकल कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेत उघडकीस आली आहे. मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी त्याच्याकडून सातत्याने पैसे उकळल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रमेश (नाव बदललेले) यांनी 7 जानेवारी रोजी कल्याण येथील जुन्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेनंतर कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील प्रक्रिया सुरू केली.
मृताच्या मोठ्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार, रमेश अनेक महिन्यांपासून सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकला होता. कुटुंबीयांनी त्याच्या मित्रांशी चर्चा केल्यानंतर तो मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याचे समोर आले. तो सतत तणावाखाली राहत असल्याची माहितीही मिळाली. आर्थिक अडचणींमुळे त्याने एका मित्राकडून दीड लाख रुपयेही उसने घेतले होते. रमेश हा उच्चशिक्षित होता. त्याने पदवी शिक्षणासोबतच कायद्याची पदवीही घेतली होती आणि एका नामांकित फार्मास्युटिकल कंपनीत झोनल मॅनेजर म्हणून कार्यरत होता. मात्र सायबर गुन्हेगारांच्या धमक्यांमुळे तो मानसिक तणावाखाली असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
Crime News: मॉर्फ केलेले अश्लील फोटो पाठवले
कुटुंबीयांना संशय आल्याने त्यांनी रमेशचे ई-मेल आणि व्हॉट्सअॅप तपासले असता 10 एप्रिल 2025 रोजीचा एक मेसेज आढळून आला. त्यामध्ये एका अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सअॅपद्वारे त्याचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो पाठवले होते. हे फोटो त्याच्या संपर्कातील लोकांना व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने पैशांची मागणी केली होती.
Crime News: धमक्या सुरूच राहिल्याने वारंवार पाठवले पैसे
पोलिसांच्या माहितीनुसार, सुरुवातीला रमेशने आरोपींना 15 हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले. मात्र त्यानंतरही धमक्या सुरूच राहिल्याने तो वारंवार पैसे पाठवत राहिला. तपासादरम्यान पोलिसांनी पंजाब नॅशनल बँकेकडून त्याच्या बँक खात्याची माहिती घेतली असता 10 एप्रिल 2025 ते 6 जानेवारी 2026 या कालावधीत त्याच्या खात्यातून विविध बँक खात्यांमध्ये अनेक ऑनलाइन व्यवहार झाल्याचे समोर आले.
Crime News: दोन लाख रुपयांहून अधिक रक्कम केली ट्रान्सफर
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मृत्यूपूर्वीच्या शेवटच्या 15 दिवसांतच रमेशने अज्ञात खात्यांमध्ये दोन लाख रुपयांहून अधिक रक्कम ट्रान्सफर केली होती. एकूण रक्कम यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. मोठी रक्कम आरोपींना पाठवूनही रमेशने आपल्या दोन मुलांची शाळेची फी भरली नव्हती, यावरून तो किती मानसिक तणावाखाली होता, हे स्पष्ट होत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
Crime News: यापूर्वीही सायबर फसवणुकीचा बळी
दरम्यान, यापूर्वीही रमेश सायबर फसवणुकीचा बळी ठरला होता. जून 2024 मध्ये काही ठगांनी बँकेचे केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने त्याची सुमारे 2.73 लाख रुपयांची फसवणूक केली होती. त्या वेळी त्याने पोलिसांकडे तसेच सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार दाखल केली होती. मात्र कुटुंबीयांच्या मते त्या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई झाली नाही आणि त्याचे पैसेही परत मिळाले नाहीत.
Crime News: सायबर गुन्हेगारांकडून पुन्हा लक्ष्य
मृताच्या पुतण्याने सांगितले की, रमेशच्या ई-मेलमधून एप्रिल 2025 मध्ये सायबर गुन्हेगारांनी पुन्हा त्याला लक्ष्य केल्याचे दिसून आले. त्यांनी मॉर्फ केलेले फोटो पाठवून ते त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांना पाठवण्याची धमकी दिली आणि पैशांची मागणी केली. रमेशने धमकीचे मेसेज, स्क्रीनशॉट आणि मॉर्फ केलेले फोटो सायबर हेल्पलाइनच्या ई-मेलवर पाठवून तक्रारही केली होती. मात्र ही बाब त्याने कुटुंबीयांना सांगितली नव्हती.
Crime News: …तर हा प्रकार टाळता आला असता
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ही टोळी अनेक महिन्यांपासून त्याला धमकावत होती आणि पैशांची मागणी करत होती. या दबावामुळे तो वारंवार पैसे ट्रान्सफर करत राहिला. मृताच्या भावाने आरोप केला की एप्रिल 2025 मध्ये केलेल्या तक्रारीची योग्य तपासणी करून वेळेत कारवाई झाली असती तर हा प्रकार टाळता आला असता. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस अधिक तपास करत असून सायबर गुन्हेगारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.