वडिलांना उपचारासाठी रुग्णालयात नेले; चोरट्यांनी घर साफ केले, तीन लाखांची रोकड, 10 तोळे दागिन्यांवर डल्ला

वडिलांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेलेल्या मुलाचे घर चोरट्यांनी साफ केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरट्यांनी घरातील तीन लाखांची रोकड आणि १० तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यानुसार उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल प्रयत्न सुरू केले आहेत.
कॅम्प नंबर २ च्या आवती चौक परिसरातील बॅरेक क्रमांक २९३ मध्ये राहणारे शंकर बलानी यांच्या वडिलांची तब्येत रविवारी रात्री अचानक बिघडली. त्यामुळे शंकर व त्यांची पत्नी वडिलांना घेऊन रुग्णालयात गेले. डॉक्टरांनी वडील गोविंदराम यांना उपचारासाठी रुग्णालयात अॅडमिट केले. त्यामुळे शंकर व त्यांची पत्नी हे दोघेही रुग्णालयातच थांबले. दरम्यान, शंकर हे रुग्णालयातून घरी परत आले आणि त्यांना धक्काच बसला. घराचे कुलूप तुटलेले पाहून ते घरात गेले असता तिजोरीतील ऐवज व रोख रक्कम घेऊन चोरट्याने पोबारा केल्याचे त्यांच्या लक्षात आले-याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी पोलीस उपायुक्त सचिन गोरे व सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पथके नेमली असून ही पथके सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्याचा शोध घेत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
१६ लाखांचा गुटखा जप्त
खालापूर – गुटख्याची वाहतूक करणाऱ्या तस्करांचा रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे. या तस्करांकडून पोलिसांनी तब्बल १६ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आवरोली टोलनाकामार्गे मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरून गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत संशयित टेम्पो ताब्यात घेतला.
कारखाली चिरडणाऱ्या तिघांना अटक
ठाणे – जमिनीच्या वादातून निष्पाप विठ्ठल गायकरला कारखाली चिरडणारा मुख्य आरोपी संतोष पवार याच्या मुसक्या आवळण्यात श्रीनगर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी महेश पवार व अमित पवार यांना जेरबंद केले होते. त्यांचा भाऊ संतोष आणि त्याचा मित्र महेश पाटील हा फरार होता. अखेर पोलिसांनी शिताफीने तपास करत संतोषच्या मुसक्या आवळल्या. त्याचा मित्र अद्याप फरार आहे.
Comments are closed.