घरात घुसून ‘तुमची विकेट काढतो, म्हणत साल्या-मेव्हण्यावर केला चाकूहल्ला

कोणतीही ओळख नसताना विनाकारण घरात घुसून, तुमची ‘विकेट काढतो’ असे म्हणत साल्या-मेव्हण्यावर चाकूहल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना 7 नोव्हेंबर रोजी बेगमपुरा परिसरातील साईमंदिरासमोर पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चाकूहल्ला करणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळल्या. मिटमिटा येथील वेदांत गणेश अभंग असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सिल्लोड तालुक्यातील पांगरी येथील कृष्णा वसंत तायडे (31) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, कृष्णा हे सध्या बेगमपुरा येथील साईमंदिरासमोर भाड्याने राहत असून स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. त्यांच्या सोबत अमर भोटकर व सूरज पाडळे हे मित्रदेखील राहतात. ते पोलिस भरतीची तयारी करतात. गुरुवारी रात्री तायडे यांचे मेव्हणे डॉ. रमेश सुखदेव दांडगे हे त्यांच्या रूमवर मुक्कामासाठी आले होते. शुक्रवारी पहाटे कृष्णा यांचे मित्र तयारीसाठी मैदानावर निघून गेले होते. पहाटे साडेचारच्या सुमारास घराची कडी वाजल्याने तायडे जागे झाले. त्यांनी दरवाजा उघडला असता एक अनोळखी युवक उभा होता. त्याने ‘रविंद्र चव्हाण कोठे आहे?’ असा प्रश्न केला. त्यावर कृष्णा यांनी तो येथे राहत नसल्याचे सांगत घरमालकाकडे विचारण्यास सांगितले. तेवढ्यात डॉ. दांडगे मोबाईलवर घरमालकाला फोन लावत असताना त्या अनोळखी तरुणाने चाकू काढत तू कोणाला फोन लावतोस, तुझी विकेटच काढतो असे म्हणत त्यांच्या डाव्या हातावर चाकूने वार केला.

त्या तरुणाला पकडले

तायडे यांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता त्या तरुणाने त्यांच्या पोटात चाकू मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हाताने वार अडवल्याने त्यांच्या उजव्या हातास गंभीर दुखापत झाली. दोघांनी मिळून त्या तरुणाच्या हातातील चाकू हिसकावून घेतला. दरम्यान, प्रॅक्टिसवरून परतलेले मित्र अमर भोटकर व सूरज पाडळे हे घरी आले. त्यांनी त्या तरुणाला पाहताच सांगितले की, ‘हा तर रस्त्यात आम्हाला थांबवून पैसे मागत होता !’

112 वर कॉल, आरोपीला बेड्या

डॉ. दांडगे यांनी तात्काळ डायल 112 वर फोन करून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीसह सर्वांना पोलीस ठाण्यात आणले. चौकशीत आरोपीचे नाव वेदांत अभंग असल्याचे समोर आले. या प्रकरणात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक प्रमोद कोळेकर करीत आहेत.

Comments are closed.