आधी 50 नंतर 25…, चिठ्ठीवर लिहून दिले आकडे, तीन वेळा धाड फसली पण परळीच्या तहसीलदाराला एसीबीचा

बीड लाच बातम्या : बीड (Beed) जिल्ह्यातील परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे (Parli Tehsildar Venkatesh Munde) यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली असून लाच (Bribe) मागितल्याच्या प्रकरणात त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईनंतर परळी तहसील कार्यालय परिसरात मोठी खळबळ उडाली असून काही नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर फटाके फोडून प्रतिक्रिया व्यक्त केली.

Beed Bribe News: चिठ्ठीवर लिहून मागितली लाच

मिळालेल्या माहितीनुसार, सॉल्वन्सी प्रमाणपत्र काढून देण्यासाठी तहसीलदार मुंडे यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला 50 हजार रुपयांची मागणी केली होती. पडताळणीदरम्यान त्यांनी चिठ्ठीवर “50” आणि नंतर “25” असे आकडे लिहून लाचेची मागणी केल्याचे तपासात समोर आले. तक्रारदाराने 20 हजार रुपये देण्याची तयारी दर्शवल्यानंतरही “आणखी तीन टाका” असे सांगत 23 हजार रुपये देण्यास सांगितल्याची माहिती आहे.

Beed Bribe News: तीन वेळा सापळा; संशय आल्याने लाच स्वीकारली नाही

या प्रकरणी तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर विभागाने तीन वेळा सापळा रचला. मात्र कारवाईची चाहूल लागल्याने मुंडे यांनी प्रत्यक्ष लाच स्वीकारली नाही. तरीदेखील लाच मागितल्याचे पुरावे स्पष्ट झाल्याने शुक्रवारी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Beed Bribe News: नांदेड येथील घरातून सोने-रोख जप्त

कारवाईनंतर एसीबीच्या पथकाने मुंडे यांच्या नांदेड येथील यशोविहार परिसरातील घराची झाडाझडती घेतली. या तपासात 13 तोळे सोने आणि सुमारे 55 हजार रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यापूर्वीच त्यांच्या जवळील सुमारे 80 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईलही जप्त करण्यात आले होते.

बीड लाच वार्ता : नागरिकांतून संताप; तहसीलसमोर फटाके फोडले

या कारवाईनंतर परळीमध्ये नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसली. काही नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर फटाके फोडत प्रतिक्रिया दिली. कन्हेरवाडी येथील शेतकरी हनुमंत फड यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांपासून शेताच्या रस्त्यासाठी प्रयत्न करूनही काम झाले नाही. अनेक ठिकाणी पुढाऱ्यांच्या सांगण्यावरूनच कामे होत असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा प्रकारचा मनमानी कारभार थांबला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

Beed Bribe News: प्रशासनात खळबळ

तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यावर एसीबीची कारवाई झाल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाई व्हावी आणि सर्वसामान्यांची कामे पारदर्शक पद्धतीने व्हावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.

आणखी वाचा

Beed Crime News: व्याजाने दिलेले पैसे परत कर म्हणत अपमानास्पद वागणूक, सावकारीच्या जाचाला कंटाळून 22 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल, बीडमधील धक्कादायक घटना

आणखी वाचा

Comments are closed.