‘आम्ही गुंड आहोत, मारून टाकू’; सराईत गुन्हेगाराच्या ‘जेलमुक्ती’साठी प्रेयसीचं भयानक कांड, महिला

नाशिक क्राईम न्यूज : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात (Nashik Road Central Jail) काही महिन्यांपूर्वी बंदिस्त असलेला सराईत गुन्हेगार कुंदन सुरेश परदेशी (Kundan Pardeshi) याला जामिनावर सोडवण्यासाठी त्याची प्रेयसी मानसी अनामिक वाळके हिने समोरच राहणाऱ्या नेत्ररोगतज्ज्ञ डॉक्टर तरुणीकडून तब्बल 4 लाख 97 हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पैसे परत मागितल्यावर ‘आम्ही गुंड आहोत, मारून टाकू’ अशी धमकी देत दहशत निर्माण केल्याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात कुंदनसह मानसी वाळके यांच्याविरोधात खंडणी व जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी असलेली 30 वर्षीय डॉक्टर तरुणी दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील रहिवासी असून सध्या नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात कार्यरत आहे. काही काळापूर्वी ती मखलमाबाद शिवारातील माळी मंगल कार्यालयाजवळील शतायू कारवॉ सोसायटीत वास्तव्यास होती. याच इमारतीसमोर मानसी वाळके राहत असल्याने दोघींमध्ये ओळख निर्माण झाली होती.

Nashik Crime News: विविध कारणे सांगत आर्थिक मदतीची मागणी

ऑक्टोबर 2024 ते 19 फेब्रुवारी 2025 या कालावधीत मानसीने सुरुवातीला मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करत डॉक्टर तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर विविध कारणे सांगत आर्थिक मदतीची मागणी सुरू केली. कुंदन परदेशी हा खून, मारामारी आणि दहशत माजवण्यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अटकेत असल्याचे सांगत, त्याला जामिनावर सोडवण्यासाठी पैशांची गरज असल्याचे मानसीने वारंवार नमूद केले.

Nashik Crime News: 4 लाख 97 हजारांची उकळली खंडणी

या कारणावरून डॉक्टर तरुणीकडून टप्प्याटप्प्याने रक्कम उकळण्यात आली. फिर्यादीतील माहितीनुसार, सुमारे 2 लाख 70 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि 2 लाख 27 हजार 580 रुपये रोख अशी एकूण 4 लाख 97 हजार 580 रुपयांची खंडणी उकळण्यात आली आहे. यात सोन्याची चेन, कानातील दागिने, अंगठी आणि मंगळसूत्र यांचा समावेश आहे.

Nashik Crime News: आर्थिक फसवणुकीला कंटाळून तक्रार दाखल

इतकेच नव्हे तर संशयित मानसीने भावनिक आधार देत डॉक्टर तरुणीला नेट बँकिंगद्वारे कर्ज काढण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. याशिवाय बजाज फायनान्सकडून कर्ज घेण्यासही तिला प्रवृत्त करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. काही दिवसांनी पैसे परत मागितल्यावर ‘कुंदन सुटून बाहेर आला तर तुझे वाईट होईल, जीव घेऊ’ अशी धमकी देत तक्रार करू नये म्हणून दबाव टाकण्यात आला. सततच्या धमक्या, मानसिक त्रास आणि आर्थिक फसवणुकीला कंटाळून अखेर संबंधित डॉक्टर तरुणीने म्हसरूळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. सध्या गंगापूर पोलिसांच्या ताब्यात असलेला कुंदन परदेशी आणि त्याची प्रेयसी मानसी वाळके या दोघांचा ताबा लवकरच म्हसरूळ पोलीस घेणार असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

आणखी वाचा

Nashik Crime News: अल्पवयीन मुलीचे बळजबरीने लग्न, वर्षभरानंतर मुलीची तक्रार; नाशिकमध्ये सासरसह माहेरच्या आठ जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल

आणखी वाचा

Comments are closed.