डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरणात नवा ट्विस्ट, घरात आढळल्या दोन वापरलेल्या सिरिंज अन् एक चाकू; प
नाशिक क्राईम न्यूज : नाशिकमधील गंगापूर रोड (Gangapur Road) परिसरात घडलेल्या डॉ. मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणाने (Dr. Manisha Jejurkar Case) शहरात मोठी खळबळ उडवली असून, या प्रकरणातील संशयित आरोपी डॉ. निलेश जेजुरकर (Dr. Nilesh Jejurkar) अद्याप फरार आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी तपासाच्या गतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
6 मार्च रोजी सकाळी सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास डॉ. मनीषा जेजुरकर यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. त्या नाशिकमधील प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे शहरात हळहळ व्यक्त होत असतानाच, आता या प्रकरणात गंभीर आरोप समोर येत आहेत.
नाशिक क्राईम न्यूज : वापरलेली दोन सिरिंज आणि एक चाकू जप्त
फिर्यादींच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करताना धक्कादायक दावा केला आहे. ज्या ठिकाणी डॉ. मनीषा यांचा मृतदेह आढळला, त्या ठिकाणी दोन वापरलेल्या सिरिंज आणि एक चाकू सापडल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हा प्रकार केवळ आत्महत्या आहे का, याबाबत संशय अधिक गडद झाला आहे. तसेच, घटनेच्या वेळी पती घरात उपस्थित असतानाही ही घटना कशी घडली, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
Nashik Crime News: पोस्टमॉर्टम अहवालात फेरफार झाल्याचा आरोप
याशिवाय, मृत्यूनंतरच्या पोस्टमॉर्टम (PM) अहवालात फेरफार झाल्याचा आरोपही कुटुंबीयांनी यापूर्वी केला होता. मात्र, या संदर्भात अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष पोलिसांकडून समोर आलेला नाही. डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या पतीवर मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या भावाच्या म्हणण्यानुसार, डॉ. निलेश जेजुरकर यांचे विवाहबाह्य संबंध होते आणि त्यातून गेल्या दीड वर्षांपासून मनीषा यांना मानसिक त्रास दिला जात होता. या सततच्या त्रासामुळे त्या मानसिकदृष्ट्या खचल्या होत्या आणि त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
Nashik Crime News: पोलिसांच्या तपासावर संशय
या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, डॉ. निलेश जेजुरकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून सखोल चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान, फिर्यादींचे वकील ॲड. जयदीप वैशपायन यांनी फरार आरोपीला जामीन देऊ नये, तसेच पोलिसांच्या तपासावरही संशय असल्याचे न्यायालयात नमूद केले आहे.
Nashik Crime News: पती डॉ. निलेश जेजुरकर अजूनही फरार
डॉ. मनीषा जेजुरकर या आयुर्वेदिक उपचार आणि समुपदेशन क्षेत्रात सक्रिय होत्या, तर त्यांचे पती डॉ. निलेश जेजुरकर हे जिल्हा सामान्य रुग्णालयात मनोविकारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. समाजात चांगली ओळख असलेल्या या दांपत्यातील वाद आणि त्यातून घडलेली ही घटना अनेक प्रश्न निर्माण करत आहे. सध्या संशयित आरोपी निलेश जेजुरकर फरार असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून, या प्रकरणात नेमके सत्य काय आहे, आरोपीला अटक कधी होते आणि तपास कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचतो, याकडे संपूर्ण नाशिकचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.