शिर्डीत दहीहंडीच्या सणाला गालबोट, दोन तरुणांनी चाकूने वार करत एकाला संपवलं, मध्यरात्री रक्तरंजि
शिर्डी गुन्हा: शिर्डीमध्ये दहीहंडीच्या (Dahi Handi 2025) दिवशी आनंदाचा माहोल असतानाच मध्यरात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. जुन्या वादातून दोन तरुणांनी सानूकुमार ठाकूर (रा. शिर्डी) या 21 वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार करत आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत निर्घृण हत्या केली. या घटनेने शिर्डी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मध्यरात्री रक्तरंजित थरार, दोन आरोपी ताब्यात
ही घटना 16 ऑगस्टच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली. साई कुमावत आणि शुभम गायकवाड अशी या दोन आरोपींची नावे असून, दोघेही शिर्डीतील रहिवासी आहेत. घटनेनंतर काही तासांतच शिर्डी पोलिसांनी दोघांना तात्काळ अटक करत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. प्राथमिक माहितीनुसार, मयत सानूकुमार आणि आरोपी यांच्यात पूर्वीपासून वाद सुरू होते. त्याच वादातून रागाच्या भरात ही हत्या झाल्याचा संशय आहे.
मयताच्या वडिलांनी दाखल केली फिर्याद
मृत सानूकुमारचे वडील नवीनकुमार ठाकूर यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता 2023 कलम 103(1), 115(2), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, पुढील तपास सुरू आहे. हत्या नेमकी का झाली? नेमका वाद काय होता, याची चौकशी पोलीस करत आहेत.
शिर्डीत भीतीचं वातावरण
ही घटना घडताच स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. गणेशोत्सव आणि अन्य सणाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून शिर्डीत गुन्हेगारीच्या घटनेत वाढ होताना दिसून येत आहे. शिर्डीतील गुन्हेगारीला आळा घालणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. शिर्डीतील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलीस काय पावले उचलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.