महाराष्ट्रात पावसाचा तडाखा; 30 जिह्यांना फटका, 17 लाख हेक्टरवरील पिके बाधित
राज्यात पावसाचे थैमान चालू असून गेल्या दोन महिन्यांत अतिवृष्टी, पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल 30 जिह्यांतील तब्बल 17 लाख 85 हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत.
ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये राज्यात 17 लाख 85 हजार 714 हेक्टर (42 लाख 84 हजार 846 एकर) क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. यात प्रामुख्याने खरीप शेतपिकांचे नुकसान झाले असून सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग, भाजीपाला, फळ पिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद या पिकांना मोठा फटका बसला आहे.
ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली आहे. उर्वरित क्षेत्रांच्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना सुरू आहेत. 195 तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे 654 महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
98 टक्के खरीप पेरणी पूर्ण
राज्यात खरीप हंगामातील पेरणी 98 टक्के पूर्ण झाली असून, एकूण पेरणी क्षेत्र 144 लाख हेक्टर आहे. विशेष म्हणजे, यंदा 14.30 लाख हेक्टरवर मक्याची पेरणी झाली असून मका पेरणी तब्बल 54 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे कापूस, मका आणि इतर पिकांसाठी टॉप ड्रेसिंग डोसची मागणी वाढली आहे.
बाधित पिके
सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी व हळद या पिकांनाही फटका बसला आहे.
या भागात नुकसान
नांदेड, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशीव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड, नागपूर आणि पुणे.
Comments are closed.