झारखंड राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग

एनडीए-समर्थित उमेदवार परिमल नथवाणी विजयी, काँग्रेसला मोठा धक्का

वृत्तसंस्था/नवी दिल्ली, रांची

राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) झारखंडमधील ‘इंडिया’ आघाडीचा बालेकिल्लाही भेदला आहे. भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी यांनी विजय संपादन करत राज्यसभेत एन्ट्री मिळविली आहे. तसेच महाआघाडीचा घटकपक्ष असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाचे उमेदवार बैद्यनाथ राम हे देखील विजयी झाले आहेत. मात्र, काँग्रेसचे उमेदवार प्रणव झा पराभूत झाल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. नथवाणी यांच्या विजयावरून किमान चार आमदारांनी क्रॉस-वोटिंग केल्याचे स्पष्ट होते.

राजकीय विश्लेषकांच्या मते, या राज्यसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम झारखंड सरकारच्या स्थिरतेवर होऊ शकतो. राज्यसभा निवडणुकीत नथवाणी यांना 28 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार प्रणव झा यांना 19 आणि जेएमएमचे उमेदवार बैद्यनाथ राम यांना 31 मते मिळाली. तीन मते अवैध घोषित करण्यात आली. झारखंड विधानसभेच्या 81 सदस्यांपैकी विजयासाठी कोणत्याही उमेदवाराला 28 मतांची आवश्यकता होती. एनडीएकडे 24 जागा होत्या. मात्र, नथवाणी यांना मिळालेल्या वाढीव मतांवरून क्रॉस-वोटिंग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. झारखंडमध्ये जेएमएमचे 34, काँग्रेसचे 16, आरजेडीचे 4, सीपीआयएमएलचे 2, भाजपचे 21 आणि एजेएसयूचा 1 आमदार आहे.

Comments are closed.