क्राय क्लबचा नवीन ट्रेंड

अश्रू ढाळून मन करतात हलकं

सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात लोक काम, परिवार आणि वैयक्तिक जबाबदाऱ्यांदरम्यान इतके गुंतून जातात की स्वत:च्या भावना मुक्तपणे व्यक्त करण्याचा वेळच मिळत नाही. वरून हास्य दाखविणारे अनेक लोक आतून तणाव, एकाकीपणा आणि मानसिक दबावाला सामोरे जात असतात. अशास्थितीत काही शहरांमध्ये एक नवा ट्रेंड वेगाने लोकप्रिय आहे. याला क्राय क्लब या नावाने ओळखले जाते. येथे लोक हसण्यासाठी नव्हे तर मुक्तपणे रडणे आणि स्वत:च्या मनाचा भार हलका करण्यासाठी पोहोचतात.

गुजरातच्या सूरतमध्ये सुरू असलेला हेल्दी क्राइंग क्लब मागील सुमारे 8 वर्षांपासून लोकांना अशा सुरक्षित वातावरण उपलब्ध करवित आहे, जेथे कुठल्याही संकोचाशिवाय स्वत:च्या भावना व्यक्त करता येतात. या क्लबमध्ये येणाऱ्या लोकांना तुम्ही का रडत आहात असे विचारले जात नाही. जर कुणी स्वत:ची कहाणी शेअर करू इच्छित असेल तर त्यांचे स्वागत केले जाते आणि जर कुणी केवळ गुपचूप बसून अश्रूंद्वारे स्वत:चे दु:ख बाहेर काढू इच्छित असल्यास त्याला देखील पूर्ण स्वातंत्र्य दिले जाते.

समाजात खासकरून पुरुषांना बालपणापासून रडणे कमकुवतपणाचे लक्षण असल्याचे शिकविले जाते. याचमुळे अनेक लोक स्वत:च्या भावना अनेक वर्षांपर्यंत दडवून ठेवतात, परंतु त्यांना अशाप्रकारचे सुरक्षित वातावरण मिळते तेव्हा मनाचा भार कमी करणे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याची जाणीव होते असे उद्गार क्लबचे संस्थापक कमलेश मसालावाला यांनी काढले आहेत.

क्लबमधील सत्रांमध्ये शांत वातावरण, मंद आवाजातील संगीत आणि आल्हाददायक वातावरण निर्माण केले जाते, ज्यामुळे लोकांना सहजपणा वाटतो. येथे येणाऱ्या लोकांमध्ये युवांपासून वृद्ध सामील असतात. अनेक जण नात्यांमधील समस्यांना तोंड देत असतात, कुणी नोकरीच्या तणावाला, तर कुणी एकाकीपणा आणि मानसिक थकव्याने ग्रस्त असतो आणि दिलासा मिळविण्याच्या अपेक्षेने पोहोचत असतो.

तज्ञांनुसार रडणे मानवाची स्वाभाविक भावनात्मक प्रतिक्रिया आहे. दीर्घकाळापर्यंत तणाव आणि दु:ख दडपून ठेवल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्य दोन्ही प्रभावित होऊ शकतात. अशास्थितीत नियंत्रित आणि सुरक्षित वातावरणात भावना व्यक्त करणे अनेक लोकांसाठी दिलाशाचे कारण ठरू शकते. परंतु जर कुणी व्यक्ती सातत्याने उदास, तणाव किंवा मानसिक समस्येला तोंड देत असल्यास त्याने मानसिक आरोग्य तज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

क्राय क्लबचा विचार जपानच्या ‘रुई-कात्सु’ संकल्पनेने प्रेरित मानण्यात येतो. हळूहळू ही धारणा अनेक देशांपर्यंत पोहोचली आणि आता भारतातील मुंबई, दिल्ली, बेंगळूर, हैदराबाद आणि सूरत यासारख्या शहरांमध्येही अशाप्रकारची सत्रं आयोजित केली जात आहेत. डिजिटल युगात लोक ऑनलाइन जोडलेले असूनही भावनात्मक स्वरुपात एकाकीपणाला तेंड देत असतात, तर असे समूह अनेक लोकांसाठी आपलेपणा आणि मानसिक दिलाशाचे एक नवे माध्यम ठरत आहेत.

 

Comments are closed.