गुजरातला हरवूनही चेन्नईचं नशीब दुसऱ्यांच्या हातात! प्लेऑफ फेरीसाठी लागणार मोठा चमत्कार

चेन्नई सुपर किंग्जसाठी आजचा सामना ‘करो या मरो’ ठरणार आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी चेन्नईला आज गुजरात टायटन्स विरुद्ध कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावाच लागणार आहे. मात्र फक्त जिंकून भागणार नाही, तर इतर संघांच्या निकालांवरही सीएसकेचे भवितव्य अवलंबून असेल.

आज (21 मे) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना सायंकाळी 7:30 वाजता सुरू होईल. दोन्ही संघ आतापर्यंत 9 वेळा आमनेसामने आले असून, त्यापैकी 5 सामने गुजरातने तर 4 सामने चेन्नईने जिंकले आहेत.

चेन्नईचं प्लेऑफ समीकरण काय?

चेन्नई सुपर किंग्जने आज गुजरातला पराभूत केल्यास त्यांच्या खात्यात 14 गुण होतील. सध्या चेन्नईचे 13 सामन्यांत 12 गुण असून नेट रनरेट -0.016 आहे.

मात्र त्यानंतरही चेन्नईला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी इतर निकालांची वाट पाहावी लागेल. राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांनी आपले अखेरचे सामने गमावणे आवश्यक आहे.

असं झाल्यास सीएसएके, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान या तिन्ही संघांचे 14-14 गुण होतील, तर पंजाब आणि कोलकात्याचे 13-13 गुण राहतील आणि ते स्पर्धेबाहेर जातील.

यानंतर प्लेऑफचं तिकीट नेट रनरेटवर ठरेल. सध्या चेन्नईचा नेट रनरेट (-0.016) दिल्लीपेक्षा (-0.871) चांगला असला, तरी राजस्थानच्या (0.083) मागे आहे. त्यामुळे चेन्नईला फक्त विजय नाही, तर मोठ्या फरकाने विजय मिळवणं गरजेचं आहे.

चेन्नईला गुजरातविरुद्ध मोठा विजय मिळवून नेट रनरेट राजस्थानपेक्षा वर न्यायचा आहे. त्याचबरोबर दिल्लीने कोलकात्याविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवू नये, अशीही चेन्नईच्या चाहत्यांची अपेक्षा असेल.

दरम्यान, जर आज चेन्नई सुपर किंग्जचा पराभव झाला, तर उर्वरित एका प्लेऑफ जागेसाठी पंजाब, राजस्थान, कोलकाता आणि दिल्ली हेच चार संघ शर्यतीत राहतील.

गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. तर स्ट्रीमिंग JioHotstar अ‍ॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

Comments are closed.