CSK vs DC: महेंद्रसिंग धोनी नेमका कुठे आहे? चेन्नई विरुद्ध दिल्ली सामन्यातून पुन्हा एकदा 'कॅप्टन कूल' गायब!

आज आयपीएल 2026 चा 48 वा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात रंगणार आहे. पण या सामन्यादरम्यान सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की, एमएस धोनी (MS Dhoni) नक्की आहे कुठे क्रिकेट विश्वातील सर्वात मोठा तारा असलेला धोनी या संपूर्ण हंगामामध्ये आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही, तरीही तो सतत चर्चेत आहे.

रिपोर्टनुसार, आयपीएल सुरू होण्यापूर्वीच धोनीच्या पिंडरीला (Calf Muscle) दुखापत झाली होती. याच दुखापतीमुळे तो अद्याप मैदानात उतरू शकलेला नाही. विशेष म्हणजे, धोनी या सामन्यासाठी दिल्लीला आलेला नाही. तो सध्या चेन्नईमध्येच असून आपल्या रिकव्हरी आणि रिहॅबवर (उपचार) लक्ष केंद्रित करत आहे. चेन्नईचे गोलंदाजी प्रशिक्षक एरिक सिमन्स यांनी धोनीबद्दल सांगितले की, धोनीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देणे माझ्या अधिकारक्षेत्रात नाही. तो सध्या दिल्लीत आमच्यासोबत नाही, पण त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तो कधी खेळणार याचा निर्णय तो स्वतःच घेईल.

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने (Axar Patel) टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षरच्या मते, खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली आहे, पण दुसऱ्या डावात ती थोडी स्लो होऊ शकते. दिल्लीच्या संघात एक बदल झाला असून लुंगी एनगिडीचे पुनरागमन झाले आहे; तो काईल जेमीसनच्या जागी खेळत आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, चाहत्यांचे लक्ष अजूनही एकाच गोष्टीकडे आहे. धोनी या सीझनमध्ये पुन्हा मैदानात दिसेल की नाही?

Comments are closed.