सीएसकेविरुद्ध ट्रिस्टन स्टब्सच्या विकेटनंतर दिल्लीचे खेळाडू-कोच पंचांशी भिडले, व्हिडिओ व्हायरल
आयपीएल २०२६ मध्ये शनिवारी (१२ एप्रिल) दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना खेळला गेला. चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अखेर चेन्नईला या हंगामातील पहिल्या विजयाची चव चाखायला मिळाली. संजू सॅमसनच्या शतकी खेळीच्या जोरावर चेन्नईने दिल्लीला २३ धावांनी पराभूत केले आणि गुणतालिकेत आपले खाते उघडले.
सॅमसनने ५६ चेंडूत ११५ धावा करत नाबाद राहिला, दुसरीकडे आयुष म्हात्रेने ५९ धावा केल्या. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी केल्याने चेन्नईने २० षटकात २ विकेट्स गमावत २१२ धावसंख्या उभारली. जेमी ओव्हरटनच्या १८ धावांत ४ विकेट्स या प्रभावी कामगिरीसमोर दिल्ली संघर्ष करताना दिसला आणि ते २० षटकात १० विकेट्स गमावत १८९ धावाच करू शकले.
यावेळी लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीकडून ट्रिस्टन स्टब्सने अर्धशतकी खेळी करत दिल्लीचा धावफलक हलता ठेवला आणि चेन्नईसाठी अडथळा निर्माण केला. यामध्ये त्याच्याबाबतीत एक घटना घडली. त्याला पंचांनी ग्लोव्ह्ज बदलण्यास नकार दिल्यानंतर नितीश राणासह दिल्लीच्या खेळाडूंनी पंचांशी वाद घातला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
लक्ष्याचा पाठलाग करताना १९ व्या षटकात स्टब्सने आपले ग्लोव्ह्ज बदलण्याची विनंती केली होती. खूप उष्णता असल्याने घामाने भिजलेल्या ग्लोव्ह्जमुळे त्याच्या पकडीवर परिणाम होत असल्याने त्याने ही विनंती केली होती, मात्र पंचांनी ती फेटाळली. करुण नायर सीमारेषेबाहेर ग्लोव्ह्ज घेऊन उभा होता, पण त्याला पंचांनी आत येण्यापासून रोखले.
स्टब्स त्या १९ व्या षटकाच्या तिसऱ्याच चेंडूवर बाद झाला. ओव्हरटनच्या त्या चेंडूवर स्टब्स मिड-ऑफवर शॉट मारण्याच्या नादात विकेट गमावून बसला. ड्रेसिंग रुमकडे परत जाताना त्याने बॅट आणि ग्लोव्ह्ज फेकून दिले.
हा दिल्लीचा या हंगामातील चार सामन्यांमधील दुसरा पराभव आहे. यामुळे ते गुणतालिकेत ४ गुणांसह चौथ्या स्थानी आहेत. चेन्नई या एकमेव विजयामुळे २ गुणांसह नवव्या स्थानी आहे.
Comments are closed.