RCB vs CSK: चेन्नई सुपर किंग्स पराभवाची हॅट्ट्रिक रोखणार का? आरसीबी विरुद्धचे आकडे काय सांगतात?
आयपीएल (IPL) 2026 च्या 11 व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) आमनेसामने येणार आहेत. हा हाय-व्होल्टेज सामना रविवारी (5 एप्रिल) बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रात्री 7:30 वाजता खेळवला जाईल. गतविजेत्या आरसीबीने आपल्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा 6 विकेट्सनी पराभव करून शानदार सुरुवात केली आहे. आता हा विजयाचा रथ कायम राखण्याच्या इराद्याने ते मैदानात उतरतील.
दुसरीकडे, पाच वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या सीएसकेची या हंगामातील सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. पहिल्या दोन सामन्यांत राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्सकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आता तिसऱ्या सामन्यात विजयाचे खाते उघडण्यासाठी चेन्नई उत्सुक आहे, पण त्यांच्यासमोर आरसीबीचे मोठे आव्हान असेल. विशेष म्हणजे, आरसीबीविरुद्धच्या गेल्या 3 सामन्यांतील चेन्नईचा रेकॉर्ड चिंतेत टाकणारा आहे.
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत हे दोन्ही संघ 35 वेळा भिडले आहेत. यामध्ये चेन्नईचे पारडे जड राहिले असून त्यांनी 21 सामने जिंकले आहेत, तर आरसीबीने 13 सामने जिंकले आहेत तर एक सामना अनिर्णित राहिला.
इतिहास चेन्नईच्या बाजूने असला तरी गेल्या काही हंगामात चित्र बदलले आहे. गेल्या सलग तीन सामन्यांत आरसीबीने चेन्नईला पराभवाची धूळ चारली आहे. गेल्या हंगामात आरसीबीने चेन्नईला एका सामन्यात 50 धावांनी, तर दुसऱ्या सामन्यात अवघ्या 2 धावांनी हरवले होते. आयपीएल 2024 मध्येही बेंगळुरूने चेन्नईवर 27 धावांनी विजय मिळवला होता. सध्याचा फॉर्म आणि संघाची ताकद पाहता आरसीबीचा संघ चेन्नईपेक्षा अधिक मजबूत दिसत आहे. अशा परिस्थितीत पराभवाची ‘हॅट्ट्रिक’ टाळून विजयाचे खाते उघडणे चेन्नईसाठी सोपे नसेल.
Comments are closed.