आयपीएलपूर्वीच सीएसकेचं टेन्शन वाढलं! दुखापतीमुळे कर्णधाराची स्पर्धेतून माघार?

साऊथ आफ्रिका टी20 लीग 2025-26 ला सुरुवात झाली आहे. अद्याप अर्धीच स्पर्धा झाली असताना, लीगमध्‍ये चांगली कामगिरी करणाऱ्या जोबर्ग सुपर किंग्स (JSK) संघाला मोठा धक्का बसला आहे. टीमचा कर्णधार फाफ डू प्लेसिस दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे. अशा परिस्थितीत फ्रँचायझीला आता नवीन कर्णधाराचा शोध घ्यावा लागणार आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेचे दोन स्टार खेळाडू पुढील कर्णधार होण्याच्या शर्यतीत दिसत आहेत, ज्यांनी आतापर्यंत या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे.

एमआय केपटाऊन विरुद्ध 10 जानेवारी रोजी झालेल्या सामन्यात जोबर्ग सुपर किंग्सचा कर्णधार आणि सलामीवीर फाफ डू प्लेसिसला अंगठ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळेच तो आता संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. फ्रँचायझीने स्पष्ट केले आहे की, डू प्लेसिसला आता शस्त्रक्रियेला (Surgery) सामोरे जावे लागू शकते. अशा स्थितीत तो साऊथ आफ्रिका टी20 लीग 2025-26 सोबतच पाकिस्तान सुपर लीग (PSL) 2026 मधूनही बाहेर होऊ शकतो. फाफला सावरण्यासाठी नेमका किती वेळ लागेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जोबर्ग सुपर किंग्सने फाफबद्दल अधिकृत विधान करताना म्हटले आहे की, ‘कर्णधार, आमचे पूर्ण प्रेम तुझ्या सोबत आहे. उजव्या हाताच्या अंगठ्याच्या लिगामेंटला दुखापत झाल्यामुळे फाफ डू प्लेसिस SA20 सीझनच्या उर्वरित सामन्यांतून बाहेर झाला आहे, ज्यासाठी शस्त्रक्रियेची गरज आहे. आमच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत.’

41 वर्षीय फाफ डू प्लेसिसने आतापर्यंत खेळलेल्या ५ सामन्यांत 27 च्या सरासरीने आणि 151.68 च्या स्ट्राईक रेटने 135 धावा केल्या आहेत. फाफचा संघ चांगली कामगिरी करून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. आता जोबर्ग सुपर किंग्सचा संघ रिली रोसो आणि वियान मुल्डर यांच्यापैकी एकाकडे कप्तानी सोपवू शकतो. या दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे फ्रँचायझी त्यांच्या नावाचा विचार करू शकते. दरम्यान, फाफचा बदली खेळाडू कोण असेल, यावर अद्याप सीएसके फ्रँचायझीने काहीही अधिकृत सांगितलेले नाही.

Comments are closed.