कल्ट सिनेमा – शोले: कल्ट लोकप्रिय?
<<सोहम पिंगळीकर>>
काहीही पॉप्युलर झालं की, त्याला ‘कल्ट’ म्हटलं जातं, परंतु ‘कल्ट फिल्म’ची खरी व्याख्या वेगळीच. या एका लेबलखाली येणाऱ्या अनेक चित्रविचित्र चित्रपटांचं वेगळेपण आणि त्यांच्या ‘कल्ट’ होण्याचा प्रवास समजावून सांगणारे हे सदर.
शोले पाहिला नसेल असा माणूस भारतात सापडणं अवघड आहे, पण खरे तर सुरुवातीला शोले चालेल की नाही याबाबत सगळ्यांना शंका होती. मात्र प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने प्रचंड यश मिळवलं. आज पन्नास वर्षांनंतरही लोकांना शोलेमधील संवाद तोंडपाठ आहेत. अशी अफाट लोकप्रियता मिळालेल्या चित्रपटांना आपण सहजपणे ‘कल्ट क्लासिक’ किंवा ‘कल्ट फिल्म’ म्हणतो, पण नेमकं ‘कल्ट सिनेमा’ ही काय भानगड आहे?
मुळात ‘कल्ट’ हा शब्द मुख्य प्रवाहापेक्षा वेगळ्या दैवताची, वेगळ्या प्रकारची आराधना करणाऱ्या अतिनिष्ठावान गटांसाठी वापरला जात असे. 1970 च्या दशकात हाच शब्द सिनेमांच्या संदर्भात वापरला जाऊ लागला. मुख्य प्रवाहापेक्षा वेगळ्या धाटणीचे, विशिष्ट आणि निष्ठावान प्रेक्षकवर्ग असणारे चित्रपटांना ‘कल्ट फिल्म’ असे म्हणले जाऊ लागले. मात्र आजकाल काहीही पॉप्युलर झालं की, त्याला ‘कल्ट’ म्हणण्याची पद्धत झाली आहे, पण पॉप्युलर आणि कल्ट हे समानार्थी शब्द नाहीत. सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला हवं की, ‘कल्ट फिल्म’ हा कोणताही ठरावीक सिनेमाप्रकार नाही. या एका लेबलखाली वेगवेगळ्या शैलींतले, वेगवेगळ्या प्रकारांचे अनेक चित्रपट येतात. भारतात रामसे बंधूंचे भयपट किंवा जागतिक स्तरावर ‘इरेझरहेड’सारख्या चित्रपटांना लोकांनी डोक्यावर का घेतलं? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण या कॉलममधून करणार आहोत. अनेक चित्रविचित्र चित्रपटांचं वेगळेपण आणि त्यांच्या ‘कल्ट’ होण्याचा प्रवास समजून घेणार आहोत.
कल्ट सिनेमाची एकच ठोस व्याख्या करणे कठीण आहे. कारण ही संकल्पना अत्यंत लवचिक आहे. त्यासाठी ठरावीक नियम नसले तरी काही लक्षणं निश्चित दिसतात. त्यातलं सगळ्यात ठळक लक्षण म्हणजे त्याचा वेडा, जिद्दी प्रेक्षकवर्ग. हे प्रेक्षक चित्रपट पुनः पुन्हा पाहतात, संवाद पाठ करतात, त्याची नक्कल करतात. आशयाच्या पातळीवर हे चित्रपट बहुतेक वेळा प्रवाहाच्या विरुद्ध जातात. ‘सिनेमात काय असावं आणि काय नसावं’ या मर्यादा ते मोडतात किंवा जाणूनबुजून ओलांडतात. त्यामुळे सुरुवातीला अनेकांना हे चित्रपट विचित्र, टोकाचे किंवा अगदी ‘चुकीचे’ वाटू शकतात.
वरच्या फोटोत दिसणारा द रॉकी हॉरर पिक्चर शो (1975) हा चित्रपट याचं उत्तम उदाहरण आहे. सायन्स फिक्शन आणि बी-ग्रेड सिनेमांना मानवंदना देणाऱया या चित्रपटाच्या वाटय़ाला सुरुवातीला थंड प्रतिसाद आणि कठोर टीकाच आली. हा म्युझिकल आहे की पॅरडी, की काहीतरी वेगळंच, हे समीक्षकांनाही समजत नव्हतं. चित्रपटाने त्या काळच्या नियमांना धुडकावून लावलं होतं. सिनेमात लैंगिकतेबद्दल मोकळेपणा, अतिशय नाटकी शैली, वेगळी वेशभूषा आणि विचित्र गाणी होती. हे सगळंच मुख्य प्रवाहासाठी अनोळखी आणि अस्वस्थ करणारे होते. पण मध्यरात्रीच्या शोमध्ये मात्र चित्र वेगळंच दिसलं. प्रेक्षक फक्त चित्रपट पाहत नव्हते, ते त्यात सहभागी होत होते. पात्रांसारखे कपडे घालणे, गाण्यांवर नाचणे, संवादांना उत्तर देणे, पडद्यासमोर दृश्यांची नक्कल करणे या सगळ्या कृतींनी एका सामूहिक विधीचं रूप घेतलं. विशेष म्हणजे ‘शोले’ आणि ‘रॉकी हॉरर पिक्चर शो’ हे दोन्ही चित्रपट एकाच वर्षी प्रदर्शित झाले. संवाद पाठ करून, पात्रांची नक्कल करून आणि त्यात सहभागी होऊन प्रेक्षकांनी या दोन्ही सिनेमांना डोक्यावर घेतलं. मग प्रश्न उरतो, हे दोन्ही चित्रपट कल्ट आहेत का?
याचं उत्तर थोडं गुंतागुंतीचं आहे. शोले हा मुख्य प्रवाहातील चित्रपट होता. मोठं बजेट, लोकप्रिय कलाकार, मजबूत पटकथा आणि प्रभावी संवाद. प्रदर्शित झाल्यानंतर तो लवकरच प्रचंड यशस्वी ठरला. त्याचा विषय आणि शैली नियम मोडणारी नसून व्यापक प्रेक्षकांना मान्य होणारी होती. आज शोलेवर केवळ प्रेमच केलं जात नाही, तर त्याचा अभ्यासही केला जातो. त्यामुळे तो एक ‘महत्त्वाचा’ आणि ‘आदर्श’ लोकप्रिय चित्रपट म्हणून स्थापित झाला आहे. या अर्थाने तो पारंपरिक ‘कल्ट’च्या व्याख्येत बसत नाही. तरीही जय-विरू, बसंती, गब्बर यांच्या नकला आजही दिसतात. “कितने आदमी थे?”, “इतना सन्नाटा क्यों है भाई?” असे संवाद रोजच्या भाषेत जिवंत आहेत. सोशल मीडियावर तर शोले अजूनही सक्रिय आहे. मग असा चित्रपट कल्ट नाही तर मग कशाला कल्ट म्हणायचं?
याच ठिकाणी कल्ट संकल्पनेची खरी गंमत दडलेली आहे. ही संकल्पना लवचिक आहे, ती कठोर नियमांवर नाही, तर लक्षणांवर आधारित आहे. त्यामुळे कल्ट हा चित्रपटाचा स्थिर गुणधर्म नसून ती प्रेक्षकांच्या वागण्यातून तयार होणारी प्रक्रिया आहे. या अर्थाने शोलेला कदाचित ‘मास कल्ट’ किंवा ‘पॉप्युलर कल्ट’ म्हणता येईल, पण ही व्याख्या जितकी पटते तितकीच गुंतागुंतही वाढवते. थोडक्यात काय तर जय-वीरूची स्कूटर आणि साईडकार जसं एक असूनही वेगळं होतात व पुन्हा एकत्र येतात, तसंच काहीसं शोले आणि ‘कल्ट’ या संकल्पनेचं नातं आहे.
(लेखिक चित्रपट समीक्षक, अभ्यासक आहेत)
Comments are closed.