Jalna news – धनगर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना व अंबड शहरात संचारबंदी लागू

धनगर आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना व अंबड शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 163(1) व 163(2) अंतर्गत आदेश जारी केला असून 17 जानेवारी 2026 रोजी सकाळी 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. संचारबंदी काळात शाळा, महाविद्यालये, दुकाने व आस्थापना बंद राहणार आहे. शस्त्र, ज्वलनशील पदार्थ व स्फोटके बाळगण्यास बंदी आहे. दवाखाने, दूध वितरण, पाणीपुरवठा, वीज, रेल्वे व प्रसारमाध्यमांना सूट देण्यात आली आहे.
धनगर समाजास अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गातून आरक्षण अंमलात आणावे या मागणीसाठी दिपक भिमराव बोऱ्हाडे यांनी मुंबईच्या आझाद मैदान येथे आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मुंबई आझाद मैदान पोलीस ठाण्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 168 अन्वये सदर आंदोलनास परवानगी नाकारली आहे. बोऱ्हाडे हे 17 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता जालना येथून विविध जिल्ह्यांतून प्रवास करत मुंबईकडे रवाना होणार होते. मात्र, सध्या राज्यात सार्वत्रिक जिल्हा परिषद निवडणूक 2026 अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू असल्याने, संबंधित जिल्ह्यांतून आंदोलनकर्त्यांसह जाण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालय, जालना यांनी नोटीसद्वारे संबंधितांना माहिती दिली आहे.

दरम्यान, आंदोलनास परवानगी नाकारण्यात आल्याने धनगर समाजाचे आंदोलनकर्ते जालना व अंबड शहरातील विविध ठिकाणी एकत्र येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्याअनुषंगाने, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकाऱ्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 (1) व 163 (2) अन्वये जालना शहर व अंबड शहरासाठी संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही संचारबंदी 17 जानेवारी रोजी सकाळी 5 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहे.

Comments are closed.