बीएसएनएलच्या नावावर सायबर फसवणूक

‘टॉवर इन्स्टॉलेशन’मधून पैसे कमावणारी बनावट वेबसाईट उघड : सावध राहण्याचा इशारा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे. इमारतींवर टॉवर बसवण्याच्या आमिषाने फसवणूक होत असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. फसवणूकदारांकडून मोबाईल टॉवर बसवण्याचे खोटे आश्वासन दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘जर तुम्ही तुमच्या मालमत्तेवर टॉवर बसवून पैसे कमवण्याचा विचार करत असाल, तर ही सूचना निश्चितच तुमच्यासाठी आहे. आम्हाला वेळीच माहिती कळवा.’ असे बीएसएनएलकडून कळविण्यात आले आहे.

https://bsnltowersite.in/ नावाची वेबसाईट बीएसएनएलचे प्रतिनिधित्व करण्याचा खोटा दावा करत आहे. ग्रामीण, निमशहरी आणि शहरी भागात इमारतींच्या छतावर टॉवर बसवण्यासाठी 25,000 ते 50,000 रुपयांपर्यंत मासिक देयके देण्याचे आश्वासन दिले आहे. तथापि, बीएसएनएलने ही वेबसाईट सरकारी मालकीच्या टेलिकॉम कंपनीशी संलग्न नसल्याचे स्पष्ट केले. साहजिकच टॉवर बसवण्यासाठी जागा देऊन पैसे कमविण्यास इच्छुक असलेल्या कोणत्याही व्यक्तीची वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी डिझाईन केलेला ‘घोटाळा’ असल्याचे म्हटले आहे.

बीएसएनएलचा अधिकृत इशारा

बीएसएनएलने देशभरातील ग्राहकांना या बनावट वेबसाईटबद्दल सतर्क करण्यासाठी एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. बनावट वेबसाईट खोटी आश्वासने देऊन लोकांना दिशाभूल करत आहे आणि वापरकर्त्यांना तिच्यावरील कोणत्याही दाव्यांकडे किंवा संदेशांकडे दुर्लक्ष करण्याची विनंती कंपनीने केली आहे. ग्राहकांना ही वेबसाईट ओळखण्यास आणि सावधगिरी बाळगण्यास मदत करण्यासाठी बीएसएनएलने बनावट वेबसाईटचा क्रीनशॉटही शेअर केला आहे. तसेच टॉवर बसवण्याबाबत कोणत्याही प्रश्नांसाठी ग्राहकांना थेट कंपनीशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

Comments are closed.