DPBI चे अधिकारी असल्याचे भासवून सेवानिवृत्त व्यक्तीची 22 लाखांची ऑनलाईन फसवणूक, देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अज्ञात सायबर भामट्यांनी ‘डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया’चे अधिकारी असल्याचे भासवून एका ७१ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीची २२ लाख २० हजार रुपयांची आँनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात सायबर गुन्हेगारांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवरूख पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, जनार्दन काशीनाथ अणेराव (वय – ७१, रा. ठाणे, मूळ रा. आंगवली, ता. संगमेश्वर) यांना १५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० ते १०.०० वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी क्रमांकावरून (मो.नं. ७२३१९०५९५५) फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव आर. के. चौधरी सांगितले आणि आपण ‘डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया, मुंबई’ येथून बोलत असल्याचे भासवले. चौधरी याने अणेराव यांना सांगितले की, त्यांच्या सिमकार्ड क्रमांकावरून लोकांना त्रास दिला जात आहे व पैशांची मागणी केली जात आहे. या संदर्भात त्यांच्याकडे एमएच ८०७४/२०२५ या क्रमांकाची तक्रार दाखल आहे, असे सांगून त्यांना तात्काळ अटक करण्याची धमकी देण्यात आली.

या धमकीमुळे घाबरलेल्या फिर्यादींना नंतर जॉर्ज मॅथ्यू नावाच्या व्यक्तीने (मो.नं. ८४३२३९७५७९) संपर्क साधला आणि त्यांचे सर्व तपशील घेतले. बनावट अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या या सायबर गुन्हेगारांनी अणेराव यांना कायदेशीर कारवाईची भीती दाखवून वेगवेगळ्या टप्प्यांत त्यांच्याकडून तब्बल २२ लाख २० हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास भाग पाडले आणि त्यांची फसवणूक केली. या प्रकारानंतर अणेराव यांनी देवरूख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांकडून सायबर गुन्हेगारांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (क), ६६ (ड) आणि व्ही. एम. एस. २०२३ चे कलम ३१८ (४), (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास देवरूखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे करत आहेत. पोलीस सध्या अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत. कोणत्याही शासकीय कार्यालयातून किंवा बोर्डाकडून फोन आल्यास नागरिकांनी तात्काळ त्या माहितीची खात्री करून घ्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांनी केले आहे.

Comments are closed.