अर्णब चक्रीवादळामुळे ओडिशा-आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस पडत आहे

किनारपट्टीच्या भागात नुकसान : मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

वृत्तसंस्था / हैदराबाद, नवी दिल्ली

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अर्णब चक्रीवादळाने उत्तर आंध्रप्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीला तडाखा दिला. दोन्ही राज्यांच्या किनारपट्टीच्या जिह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. जोरदार पर्जन्यवृष्टी आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बऱ्याच भागात पडझड झाल्याने नुकसान झाले आहे.

दक्षिण ओडिशाच्या 10 जिह्यांमधील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. जवळपास 5,000 लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते. चार पुलांवर पाणी साचल्याने मलकानगिरीमध्ये वाहतूक थांबवण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणास्तव राष्ट्रीय महामार्गही बंद करण्यात आला होता. दरम्यान, राउरकेला येथील सिव्हिल टाऊनशिपमधील 150 फूट उंच गणेश मंडप वादळामुळे कोसळला.

आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिह्यातील कलिंगपट्टणमच्या अनेक भागांमध्ये ताशी 75 किमी वेगाच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. विजयवाडा येथील सखल भागांमध्ये पाणी साचले होते. शहरातील अनेक शाळा सलग दुसऱ्या दिवशी बंद ठेवाव्या लागल्या. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पश्चिम बंगालच्या काही भागांमध्येही मुसळधार पाऊस कोसळला. दार्जिलिंग आणि कालिम्पोंगसाठी मेघगर्जना आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, या वादळाचा परिणाम मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही जाणवणार आहे. मध्यप्रदेशातील 10 जिह्यांसाठी मुसळधार पावसाचा, तर छत्तीसगडमधील 15 जिह्यांसाठी पाऊस आणि मेघगर्जनेचा इशारा देण्यात आला आहे.

ओडिशाच्या मलकनगिरीमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक पूल वाहून गेले असून, मलकनगिरी, कालीमेला, मोटू आणि पोडिया दरम्यानचा संपर्क तुटला आहे. राष्ट्रीय महामार्ग 326 वर शेकडो वाहने अडकून पडली होती. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील अनेक सखल भागांमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचले होते. ओडिशाच्या चिलिका या किनारपट्टीच्या जिह्यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक बोटी उलटून बुडाल्या. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ओडिशामध्ये गेल्या 24 तासांत सरासरी 70 मिमी पावसाची नोंद झाली असून, कोरापुट जिह्यातील सिमिलिगुडा येथे सर्वाधिक 193.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. किनारपट्टीच्या भागात दोन दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी हवामान राहील असा इशारा देण्यात आला आहे.

Comments are closed.