बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ

आंध्र किनारपट्टीवर बुधवारी धडकणार : बिहारपासून प. बंगालपर्यंत 12 राज्यांमध्ये प्रभाव जाणवणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रविवारी चक्रीवादळात रुपांतर झाले. या चक्रीवादळाला ‘अर्णब’ असे नाव देण्यात आले आहे. या वादळामुळे ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच देशभरातील अनेक राज्यांमधील हवामानात बदल झाला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ बुधवार, 28 ऑक्टोबर रोजी आंध्र किनारपट्टीवर धडकणार आहे.

बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र 26 ऑक्टोबरपर्यंत पूर्णपणे चक्रीवादळात रुपांतरित झाल्यानंतर 28 ऑक्टोबरपर्यंत उत्तर आंध्र प्रदेश आणि लगतच्या दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीकडे सरकू शकते, असे हवामान विभागाने म्हटले आहे. यामुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता असून त्याचा परिणाम पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडपर्यंत पसरणार आहे.

हवामान विभागाने अनेक राज्यांच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा अंदाज वर्तवला आहे. रविवारी केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने केरळ आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. चक्रीवादळामुळे 27 आणि 28 ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेशात आणि 28 ऑक्टोबर रोजी ओडिशा, तेलंगणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

तामिळनाडूत अनेक जिह्यांमध्ये रेड अलर्ट

हवामान विभागाने तामिळनाडूच्या अनेक जिह्यांमध्ये पुढील तीन दिवसांसाठी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विल्लुपुरम, कु•ालोर, मयिलादुथुरै, नागपट्टिनम, तिरुवरूर, तंजावर, कल्लाकुरिची, तिरुवनमलाई आणि कोईम्बतूर जिह्यांमध्ये, तसेच पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. याव्यतिरिक्त, तिरुवल्लूर, चेन्नई, चेंगलपट्टू, कांचीपुरम, पुदुकोट्टाई, वेल्लोर, राणीपेट, तिरुपत्तूर आणि अरियालूर जिह्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. थेनी, दिंडीगुल आणि मदुराई जिह्यांमध्येही मुसळधार पाऊस पडू शकतो. या सर्व जिह्यांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

केरळमध्येही सतर्कतेचे आदेश

भारतीय हवामान विभागाने सोमवारसाठी केरळच्या पाच जिह्यांमध्ये अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. 26 ऑक्टोबर रोजी इडुक्की आणि पालक्काड जिह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला. याच दिवशी मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता तिरुवनंतपुरम, कोल्लम, पथानामथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम, इडुक्की आणि एर्नाकुलम जिह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बिहार, झारखंडमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 28 ते 30 ऑक्टोबर दरम्यान बंगाल, बिहार आणि झारखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोमवारपासून हवामान खराब होण्यास सुरुवात होईल आणि काही भागांमध्ये पाऊस पडू शकतो. 27 ऑक्टोबर रोजी बिहार आणि झारखंडमध्ये ताशी 30-40 किमी वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून, काही भागांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी 50 किमीपर्यंत पोहोचू शकतो. 29 ते 30 ऑक्टोबर दरम्यान उत्तर प्रदेशात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळाचा सामना करण्यास ओडिशा सज्ज

ओडिशामध्ये चक्रीवादळाच्या शक्यतेने राज्य सरकारने तयारी तीव्र केली आहे. मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी लोकसेवा भवनात अधिकाऱ्यांसोबत चक्रीवादळाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या वेळीही जीवित आणि मालमत्तेची कोणतीही हानी होऊ नये, हे सुनिश्चित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. राज्य सरकारने संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी मदत आणि बचाव पथके तयार केली आहेत. ओडिशा आपत्ती जलद कृती दलाची सुमारे 60 पथके, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची 17 पथके आणि अग्निशमन दलाची 225 पथके सतर्क आहेत. 28 ऑक्टोबर रोजी उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीवर वारे धडकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ओडिशाच्या अनेक जिह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाचे वारे वाहू शकतात.

28-29 ऑक्टोबर रोजी ओडिशात शाळा-कॉलेज बंद

संभाव्य चक्रीवादळाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर ओडिशातील गंजम, गजपती, रायगडा, कोरापुट आणि मलकानगिरी जिह्यांमधील शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाडी केंद्रे 28 आणि 29 ऑक्टोबर रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत. इतर जिह्यांमधील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याबाबतचा निर्णय स्थानिक परिस्थितीनुसार संबंधित जिल्हाधिकारी घेणार आहेत. दक्षिण ओडिशाच्या जिह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा अधिक प्रमाणात पडण्याची शक्यता आहे. किनारपट्टीच्या जिह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे. लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी चक्रीवादळ आणि पूरग्रस्तांसाठी निवारा केंद्रे तयार करण्यात आली आहेत. रुग्ण आणि गर्भवती महिलांना आरोग्य केंद्रांपर्यंत वेळेवर पोहोचवण्यावरही विशेष लक्ष दिले जात आहे.

Comments are closed.