विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!

मालेगाव बाजार समिती : अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) मालेगाव बाह्य मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे (Dada Bhuse) आणि शिवसेना ठाकरे गटाचे अद्वय हिरे (Advay Hiray) यांच्या लढत झाली होती. दादा भुसे यांनी अद्वय हिरे यांचा दीड लाखाहून अधिक मताधिक्क्याने पराभव केला होता. या पाठोपाठ दादा भुसे यांनी अद्वय हिरेंना पुन्हा एकदा मोठा धक्का दिलाय. नाशिक जिल्ह्यातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या मालेगाव बाजार समितीतील (Malegaon Bajar Samiti) अद्वय हिरे यांच्याकडील सत्ता दादा भुसे यांनी खेचून आणली आहे.

मालेगाव बाजार समितीच्या सभापतीपदी शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत शेवाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपसभापतीपदी अरुणा सोणजकर यांची निवड झाली आहे. त्यामुळे मालेगाव बाजार समितीतील अद्वय हिरे यांची सत्ता संपुष्टात आली आहे. तर मंत्री दादा भुसे यांचा या निवडणुकीत करिष्मा दिसून आला आहे.

मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!

मालेगाव कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत भुसे यांच्या विरोधात अद्वय हिरे यांनी 18 पैकी 14 जागा जिंकून आणत भुसेंना जोरदार धक्का दिला होता. तर दादा भुसे यांच्या गटाला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे भुसे गटाची बाजार समितीवरील सुमारे 15 वर्षांची सत्ता संपुष्टात आली होती. मात्र, त्यानंतर आता भुसेंनी हिरेंना जोरदार धक्का दिलाय. मालेगाव बाजार समितीत पुन्हा एकदा दादा भुसे यांनी आपल्या गटाची सत्ता स्थापन केली आहे.

कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष

निवडणुकीआधी हिरेंचे सहा समर्थक दादा भुसेंच्या गटात सहभागी झाले होते. त्यानंतर हे समर्थक दोन दिवसांच्या सहलीसाठी रवाना झाले होते. तसेच काही दिवसांपूर्वी जिल्हा उपनिबंधकांनी तत्कालीन मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अद्वय हिरे यांचे बाजार समितीतील सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचा निर्णय दिला होता. बाजार समितीच्या कार्यकाळात मासिक सर्वसाधारण सभांना गैरहजर असल्याने हिरे यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. यानंतर आज सभापती आणि उपसभापतीपदाची निवडणूक पार पडली.मालेगाव बाजार समितीचे 18 पैकी तब्बल 14 संचालक भुसे गटात आल्याने सत्ता परिवर्तन झाले. दादा भुसे गटाच्या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केल्याचे दिसून आले.

आणखी वाचा

Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

अधिक पाहा..

Comments are closed.