कीर्ती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राजकीय कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची सक्ती, युवासेनेकडून तीव्र निषेध
दादरच्या के.एम. डुंगरसी कीर्ती महाविद्यालयात विद्यार्थ्यांना एका राजकीय व सामाजिक संघटनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी सक्ती केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांनी युवासेनेकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या तक्रारींची गंभीर दखल घेत युवासेनेने तीव्र संताप व्यक्त केला असून महाविद्यालय प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला आहे.
विश्व हिंदू परिषद काsंकण प्रांतातर्फे श्री षण्मुखांनद सभागृह येथे 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता अशोक सिंघल यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘ग्रँड यूथ कॉन्फरन्स’ आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील एनएसएस आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यासाठी महाविद्यालयाने पत्रक जारी केले आहे. अनेक विद्यार्थ्यांचा अशा प्रकारच्या कार्यक्रमांना विरोध असतानाही महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यासाठी बळजबरी केली जात असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये राजकारणविरहित शिक्षण मिळणे हा विद्यार्थ्यांचा मूलभूत अधिकार असताना कीर्ती कॉलेजसारख्या संस्था नको ते प्रयत्न करत असल्याचा आरोप करत युवासेनेने याचा तीव्र निषेध नोंदवला आहे. या प्रकरणी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना संपर्क साधून तीव्र शब्दांत जाब विचारला. तसेच मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन देऊन तातडीने अशा महाविद्यालयांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Comments are closed.