डहाणू-जव्हार मार्गावर ‘सावित्री’ दुर्घटनेचा धोका; चौपदरीकरणाचे काम लटकल्याने एक डझनहून अधिक पुलांच्या दुरुस्तीचे काम कागदावरच

पालघर जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड व जव्हार या तालुक्यांना जोडणारा महत्त्वाकांक्षी डहाणू-जव्हार राज्यमार्ग सध्या रखडलेल्या अवस्थेत आहे. या कामात अनेक झाडांची कत्तल होणार असल्याने याविरोधात पर्यावरणवाद्यांनी न्यायालयात धाव घेतली असून पावसाळ्यानंतरच कामाला गती मिळण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. दरम्यान या मार्गावर एक डझन म्हणून अधिक जीर्ण पूल व साकव असल्याने सावित्री पुलासारखी भीषण दुर्घटनेची शक्यता आहे. त्यामुळे तत्काळ या मार्गावरील जुनाट पुलांची दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

डहाणू-जव्हार राज्यमार्गाच्या सिमेंट काँक्रीटीकरण व चौपदरीकरण प्रकल्पाचे उद्घाटन 11 ऑक्टोबर 2024 रोजी करण्यात आले होते. तब्बल 250 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पात डहाणू पार नाका ते सरावली नाका चौपदरीकरण तर सरावली ते चारोटीदरम्यान दहा मीटर रुंदीचा सिमेंट महामार्ग प्रस्तावित आहे. या मार्गामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा पर्याय उपलब्ध होणार असून अपघातांचे प्रमाण कमी होईल, असा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे डहाणूपासून या कामाची सुरुवातदेखील करण्यात आली होती. मात्र या मार्गाच्या रुंदीकरणासाठी हजारो झाडे तोडली जाणार असल्याने याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रकल्प कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे.

परवानगी मिळाल्यानंतरच कामाला सुरुवात
डहाणू नगर परिषद व पर्यावरण प्राधिकरणाकडून झाडांच्या फांद्या तोडण्यास परवानगी मिळाल्यानंतरच काम पुन्हा सुरू होणार असल्याचे के. सी. प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान राज्यमार्गावर एक डझनहून अधिक जुनाट व जीर्ण पूल, साकव व रस्ते आहेत, जे पावसाळ्यात वाहतुकीस अत्यंत धोकादायक ठरू शकतात. याठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या धोकादायक ठिकाणांची तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे

Comments are closed.