डहाणूत शिवसेनेच्या प्रचारफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

डहाणू नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रभाग क्रमांक १ मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार आणि तालुकाप्रमुख संजय पाटील आणि कल्पिता तुंबडे यांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी शिवसेना आणि कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचे कार्यकर्ते जोरदार परिश्रम घेत आहेत.
दोन्ही उमेदवारांच्या प्रचारफेरीत आमदार कॉ. विनोद निकोले यांनी सहभाग घेतला. घरोघरी मतदारांशी संपर्क करून पाटील आणि तुंबडे यांना निवडून देण्याचे आवाहन आमदार निकोले यांनी केले. प्रचारफेरीदरम्यान आदिवासी पाडे, विविध वस्त्या आणि व्यापारी परिसरातून दोन्ही उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. पक्षाचे झेंडे, फलक आणि घोषणांनी प्रभाग दणाणून गेला. नागरिकांशी थेट संवाद साधला जात असल्यामुळे प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावेळी पालघर जिल्हाप्रमुख गिरीश राऊत, वासू तुंबडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
अलिबागमध्ये शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ
अलिबाग नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून संदीप पालकर व श्वेता पालकर निवडणूक लढवत आहेत. शनिवारी पक्षाच्या महिला आघाडी तालुका संघटक स्नेहल देवळेकर यांच्या हस्ते गणेश मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर मतदारांच्या घरोघरी जात संदीप पालकर व श्वेता पालकर यांनी आपला प्रचार सुरू केला. प्रचार फेरीत शिवसैनिकांसह नागरिक सहभागी झाले होते. शिवसेना उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
मतदार याद्यांमध्ये घोळ; मनसेचा आज ठाणे पालिकेवर मोर्चा
ठाण्यातील मतदार याद्या सदोष असून निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. या मतदार याद्या मनसेच्या रडारवर आल्या असून ठाणे महापालिका मुख्यालयातील निवडणूक विभागावर उद्या सोमवारी मनसेचा मोर्चा धडकणार आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा तब्बल ४ लाख मतदार वाढले आहेत. मजूर नकाशा आणि त्यामधील मतदार संख्या मतदार यादीमधील संख्या यामध्येही काही हजारांची तफावत आहे. निवडणूक आयोग पूर्णपणे पक्षपाती भूमिका घेत असल्याचे दिसून येत असून प्रशासनाला अनुकूल अशी भूमिका घेत असल्याने याला मनसेने आक्षेप घेतला असून पालिका मुख्यालयावर मोर्चा काढून जाब विचारणार आहेत.
पोलिसांचे कायदा सुव्यवस्थेबाबत मार्गदर्शन
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने कल्याण तालुक्यातील खडवली गट व बेहरे गणामध्ये कोसले गावामध्ये कायदा सुव्यवस्थेबाबत पोलिसांनी मार्गदर्शन केले. टिटवाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली. यावेळी सरपंच दिलीप पालवी यांच्यासह ग्रामस्थ होते.

Comments are closed.