गोविंदा आला रे SS च्या गजराने ठाणे, पालघर, रायगड दणाणले, बोल बजरंग बली की जय…लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट
बोल बजरंग बली की जय… गोविंदा आला रे SS आला… अशा पारंपरिक भन्नाट गाण्यांवर नटखट गोविंदांनी हंड्या फोडून उत्साहाचे लोणी मटकवले. ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मुरबाड, अंबरनाथ, पनवेल, नवी मुंबई तसेच रायगड व पालघर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांत दहीहंड्यांमधील लोणी लुटण्यासाठी बालगोपाळांनी थरावर थर रचत लाखोंच्या बक्षिसांची लयलूट केली. मुंबई तसेच ठाण्यातील महिला व पुरुष गोविंदांनी ००० थर लावून विक्रम नोंदवला. शुक्रवारी रात्रीपासूनच अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावून गोविंदांना चिंब केले. शहरापासून ग्रामीण भागांतही सर्वच ठिकाणी उत्साहाचा कल्ला पाहायला मिळाला.
कल्याणमध्ये शिवसेनेची एकनिष्ठ हंडी
कल्याण : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कल्याण शहर शाखेच्या शंकरराव चौकातील मानाच्या एकनिष्ठ दहीहंडीला हजारो गोविंदांनी हजेरी लावली. यावेळी शिवसेना उपनेते विजय (बंड्या) साळवी, अल्ताफ शेख, जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर, शहरप्रमुख बाळा परब, महिला शहर संघटक मीनल कांबळे, सुजाता धारगळकर, गटनेते उमेश बोरगावकर, नगरसेवक विशाल गारवे, संकेत भोईर, अपर्णा भोईर, किशोर मानकामे, विलास म्हात्रे उपस्थित होते.
रायगडात आठ हजार दहीहंड्यांचे लोणी फस्त
अलिबाग : रायगड जिल्ह्यात तब्बल ८ हजार ८९० दहीहंड्यांमधील लोणी बालगोपाळांनी फस्त केले आहे. अलिबाग, पेण, रोहा, उरण, महाडसह सर्वच तालुक्यांमध्ये दहीहंडीचा उत्साह टिपेला पोहोचला होता. जिल्ह्यात विविध ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात गोविंदा पथकांनी ३३९ पथकांनी मिरवणुका काढल्या. जिल्ह्यात १ लाख रुपयांहुन अधिक रकमेची बक्षिसे असलेल्या ३२ दहीहंड्या उभारण्यात आल्या होत्या. लाखोंची बक्षिसे असलेल्या या हंड्या फोडण्यासाठी सर्वच पथके थरावर थर रचून प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते.
वाड्यात पाच पथकांची सात थरांची सलामी
शिवसेनापुरस्कृत उपजिल्हाप्रमुख गोविंद पाटील यांच्या मानाच्या दहीहंडीला पाच गोविंदा पथकांनी सात थरांची सलामी दिली. त्यामुळे चिठ्ठी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये आई जिजाऊ गोविंदा पथकाचे नाव आल्याने २१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि आकर्षक चषक देऊन या मंडळाचा सन्मान करण्यात आला. याबरोबरच वाड्यातील महिला गोविंदा पथकानेदेखील हंडी फोडून ११ हजार रुपयांचे रोख बक्षीस पटकावले. यावेळी पद्मश्री भिकल्या धिंडा व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष भाग्यश्री भोईर यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील, नीलेश भोईर, शिवसेनेचे पालघर जिल्हा सहसंपर्कप्रमुख नीलेश गंधे, तालुकाप्रमुख नीलेश पाटील, विलास आकरे, चंद्रकांत पष्टे, मनेश पाटील, वाडा पंचायत समितीच्या माजी सभापती अस्मिता लहांगे आदींसह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते. उत्सवाचे आयोजक गोविंद पाटील, प्रभाकर पाटील, दीपेश पाटील, तेजश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन स्वप्नील पाटील व राजन गरुड यांनी केले.
कुर्डूसच्या विहिरीवर गोविंदाचा सूर
अलिबाग : पोयनाडजवळील कुर्डूस गावात मानवी मनोरे रचत विहिरीवरील हंडी फोडण्याची परंपरा आहे. या हंडीचे आयोजन देवळाली गोविंदा पथक कुर्डूस यांच्यामार्फत करण्यात येते. विहिरीच्या गोल कठड्यावर गोविंदा बसतात आणि ते हंडी फोडणाऱ्या गोविंदाला हाताच्या पंज्यात उचलून हंडीच्या दिशेने भिरकावतात. त्यानंतर हा गोविंदा दहीहंडीला हात लावून विहिरीत मध्यभागी पडतो आणि बक्षीस पटकावतो.
लेडीज डब्यात दहीहंडीची धम्माल
बदलापूरहून ठाण्याच्या दिशेने धावणाऱ्या सकाळी ७.५६ वाजताच्या लोकल मधील लेडीज डब्यातही दहीहंडीचा जल्लोष रंगला. हा डबा रंगीबेरंगी पताका आणि फुलांनी सजवला होता. डब्यात छोटी हंडी बांधण्यात आली होती. धावत्या रेल्वेत महिलांनी गाण्याच्या तालावर ठेका धरत दहीहंडीचा आनंद लुटला.
डोंबिवलीच्या गांधीनगरात उत्साहाचा काला
डोंबिवली : गांधीनगर मित्र मंडळाच्या वतीने जनरल अरुणकुमार वैद्य चौकात हजारो गोविंदांनी हजेरी लावत उत्साहाचा काला केला. यावेळी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, मंडळाचे अध्यक्ष तथा कल्याण लोकसभा जिल्हा युवा अधिकारी प्रतीक पाटील, मंडळाचे उपाध्यक्ष जयेश पाटील, सचिव निबिन पिल्ले, विधानसभा युवा अधिकारी आदित्य पाटील, दिवा महिला शहर संघटक ज्योती पाटील, किरण शिंदे उपस्थित होते.
ठाण्यात ३८ गोविंदा जखमी
ठाणे : शहरात दहीहंडी उत्सवादरम्यान ३८ गोविंदा जखमी झाले आहेत. त्यामध्ये एका ६५ वर्षीय गोविंदाचाही समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात २२ तर जिल्हा शासकीय रुग्णालयात १६ गोविंदा उपचारासाठी दाखल झाले आहेत.
जव्हारमध्ये थरथराट
जव्हार : शहरातील विविध भागांमध्ये १५ दहीहंड्या उभारण्यात आल्या होत्या. यावेळी उंच मानवी मनोरे उभारून गोविंदा पथकांनी थरारक सलामी दिली. जय बजरंग बली गोविंदा पथक – जव्हार संस्थान, दर्या सारंग गोविंदा पथक आणि हर हर महादेव गोविंदा या तीन प्रमुख पथकांनी सर्वाधिक दहीहंडी फोडून विजयाचे लोणी चाखले. यशवंतनगर भागात शिवसेना उपशहरप्रमुख पप्पू सावंत यांनीदेखील आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला अनेक पथकांनी भेट दिली.
२५ वर्षांची परंपरा
डोंबिवली : शिवसेनेच्या डोंबिवली पूर्व गोपाळनगर शाखेच्या वतीने गेली २५ वर्षं दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. माजी जिल्हाप्रमुख तात्यासाहेब माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी उपजिल्हाप्रमुख विलास म्हात्रे, विधानसभा संघटक किशोर मानकामे, उपशहरप्रमुख प्रमोद कांबळे, जगदीश जुलुम, अमोल वैद्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Comments are closed.