ढाक्कुमाकुम… मुंबापुरी झाली गोविंदामय! मुंबईसह राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष
‘गोविंदा रे गोपाळा’ म्हणत भल्या पहाटेपासून घराबाहेर पडलेली गोविंदा पथके, नाक्यानाक्यावर क्रेनवर लटकवलेल्या लाखमोलाच्या दहीहंड्या, ढोल-ताशांच्या तालावर थिरकणारी पथके, गोविंदा पथकांचा उत्साह वाढवण्यासाठी रंगारंग कार्यक्रम अन् सेलिब्रिटींनी लावलेली हजेरी, श्वास रोखायला लावणारे मानवी मनोरे पाहण्यासाठी झालेली एकच गर्दी… असे जल्लोषमय वातावरण शनिवारी गोपाळकाल्यानिमित्त मुंबई शहरासह उपनगरांत पाहायला मिळाले. रात्री उशिरापर्यंत थरांचा थरार सुरूच होता. शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीदेखील मुंबईतील विविध दहीहंडी उत्सवांना भेट देऊन गोविंदांचा उत्साह वाढवला.

थरांवर रंगला पावनखिंडीचा रणसंग्राम; आयडियलच्या हंडीत शिवसागर पथकाचा देखावा
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि दादर येथील आयडियल बुक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच श्री साईदत्त मित्र मंडळ आणि बाबूशेठ पवार व मित्र मंडळ यांच्या सहकार्याने आयडियल गल्ली, दादर येथे पर्यावरणपूरक दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. गोविंदा आणि गोपिकांचा उत्साह वाढवण्यासाठी अनेक कलाकारांनीही हजेरी लावली होती. शिवसागर गोविंदा पथकाने चौथ्या थरावर सादर केलेला ऐतिहासिक देखावा या दहीहंडीचे वैशिष्ट्य ठरले. शिवसागर गोविंदा पथकाने तीन थर रचून चौथ्या थरावर बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचा इतिहास मांडला. थरांच्या थरारावर रंगलेला पावनखिंडीचा रणसंग्राम पाहून सर्वजण अचंबित झाले. गेल्या ११ वर्षांपासून हे पथक मानवी मनोऱ्याच्या माध्यमातून सामाजिक आणि ऐतिहासिक विषयांवर भाष्य करत आहे.

जॉली स्पोर्ट्स क्लबच्या महिला गोविंदा पथकाने पाच थरांचा मानवी मनोरा रचत यंदाची पहिली दहीहंडी फोडली. विशेष म्हणजे, कोणतीही पडझड न होता अत्यंत सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने महिला गोविंदांनी थर रचून काही क्षणांतच हंडी फोडली.

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दक्षिण मुंबई विभाग क्र. १२ च्या वतीने आयोजित ‘जन्मशताब्दी साहेबांची, निष्ठावंतांची दहीहंडी’ या दहीहंडी उत्सवाला भेट दिली. या वेळी विभागप्रमुख संतोष शिंदे हेदेखील उपस्थित होते.

शिवसेना व ‘धगधगती मुंबई’च्या वतीने आयोजित उत्सवात मावळ मराठा पथकाचा सत्कार करताना शिवसेना अपंग सहाय्य सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत लाडे, आयोजक विधानसभा निरीक्षक यशवंत विचले, भीमराव धुळप, वैभव लाडे, संतोष काळे, विशाल चाफे उपस्थित होते.

कांजूरमार्ग शिवाजी क्रीडा मंडळाची हंडी आशीर्वाद गोविंदा पथकाने फोडली. या वेळी आमदार सुनील राऊत, नगरसेविका श्वेता पावस्कर, उपविभागप्रमुख आनंद पाताडे, शाखाप्रमुख रवींद्र महाडिक आणि सर्व शिवाजी क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

घाटकोपरच्या शूरवीर बाजीप्रभू मंडळाच्या वतीने आयोजित उत्सवाला संस्थापक नाना उतेकर, अध्यक्ष संतोष नेरकर, प्रकाश वाणी, अशोक वंडेकर, विजय चपटे, महेश पोद्दार, बावनाथ गोसावी, खिमजी पटेल आदी उपस्थित होते.

भवानी प्रतिष्ठानचा ममता चषक वाळकेश्वरच्या सिद्धेश्वर गोविंदा पथकाने पटकावला. शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर यांनी ताडदेव येथे आयोजित केलेल्या या महोत्सवाला शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, उपनेते राजकुमार बाफना, भैरूलाल चौधरी उपस्थित होते.

शुभदा शिंदे यांच्या श्री रामवरदायिनी पथकाला शुभेच्छा देताना विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, नंदकुमार मोरे, प्रियांक राऊत, पांडुरंग देसाई, विनोद राजेशिर्के, चेतन कदम, गुलाबचंद्र मौर्या, अश्विनी सावंत, दीपा चुरी उपस्थित होते.
Comments are closed.