आला रे आला…गोविंदा आला, मुंबईसह राज्यभरात दहीहंडीचा थरार ; आदित्य ठाकरे यांनी वाढवला गोविंदा पथकांचा उत्साह

श्वास रोखायला लावणारे दहीहंडीचे थरारक मनोरे आणि एकजुटीचा प्रत्यय आज मुंबईसह राज्यभरात गोविंदा पथकांच्या माध्यमातून पाहता आला. गोविंदा पथकांनी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मुंबई – ठाण्यात हंडी फोडत लोण्यावर ताव मारला. घाटकोपर आणि ठाण्यातील मनसेच्या दहीहंडीत जोगेश्वरीच्या जय जवान पथकाने दहा थरांची सलामी दिली. पार्ले स्पोर्टस क्लबच्या महिलांनीही सात थरांची सलामी देत विक्रम रचला.

वरळी मतदारसंघातील शिवसेना शाखा क्र. 193च्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावत गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला. आदित्य ठाकरे यांच्यासोबत गोविंदांनी सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली. लहान मुलांनीही आदित्य ठाकरे यांच्याशी हस्तांदोलन केले. तसेच त्यांनी पारंपारिक गाण्यांवर गोविंदांसोबत ठेकाही धरला. शाखा क्र. 198 च्या वतीने लोअर परळ, शाखा क्र.119 च्या वतीने करी रोड नाका आणि प्रभादेवी येथील सहय़ाद्री प्रतिष्ठानच्या अशा मुंबईतील विविध दहीहंडी उत्सवांनादेखील आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, शिवसेना उपनेते-आमदार सचिन अहिर, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, आमदार सुनील शिंदे, आमदार महेश सावंत, विभागप्रमुख आशिष चेंबूरकर, माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्यासह शिवसेना-युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

जोगेश्वरीची पोरं हुश्शार

जोगेश्वरी पूर्व येथील कोकण नगर गोविंदा पथकाने ठाणे येथे पहिल्यांदा दहा थर लावून विश्वविक्रम केला.

जोगेश्वरी पूर्व येथील हिंदमाता गोविंदा पथकाने स्वामी प्रतिष्ठान आणि गोपुळ मित्र मंडळ, ठाणे यांच्या वतीने आयोजित दहीहंडीत आठ थराचा मानवी मनोरा रचला.

आयडियलच्या दहीहंडीत संभाजी महाराजांच्या शौर्याला सलाम

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आयडियल बुक पंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच श्री साई दत्त मित्र मंडळ आणि बाबू शेठ पवार व मित्र मंडळ यांच्या सहकार्याने दादरच्या आयडियल गल्लीत आयोजित दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी गर्दी उसळली होती.  मालाड पूर्वेच्या शिवसागर गोविंदा पथकाने छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास मांडला.  यावेळी उपस्थितांनी टाळय़ांचा कडकडाट करत ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ अशी जोरदार घोषणाबाजी केली.  तसेच दिव्यांग व अंध गोविंदा पथकाने लावलेले पाच थर आकर्षणाचा पेंद्रबिंदू ठरले. धारावीच्या सुभाष नगर येथील तेजस्विनी महिला दहीहंडी आणि पुरुष पथकाने सलामी दिली. ‘दशावतार’ चित्रपटातील कलाकारांचीदेखील उपस्थिती यावेळी होती.

विभागप्रमुख-आमदार महेश सावंत यांच्या वतीने प्रभादेवी येथे आयोजित दहीहंडी उत्सवात माजी महापौर महादेव देवळे यांनी दहीहंडीला सलामी दिली. वयाच्या 86 व्या वर्षीही असलेला त्यांचा सळसळता उत्साह पाहून उपस्थित भारावले.

शिवसेना शाखा क्र.206 च्या वतीने शिवडी नाका येथे निष्ठावंतांच्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. या उत्सवाचे आयोजन माजी नगरसेवक सचिन पडवळ, शाखाप्रमुख हनुमंत हिंदोळे यांनी केले. शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते गोविंदा पथकांना  गौरविण्यात आले.

पसायदान या संस्थेच्या वतीने दादरच्या हिंदू कॉलनीतील आयोजित भव्य दहीहंडी उत्सवात पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या महिला पथकाने सहा थर तर वडाळय़ाच्या राजा शिवशक्ती पथकाने आठ थर लावले.

विक्रोळी युवा मंच महिला गोविंदा पथकाला कांजूरमार्ग येथे स्वराज्य मित्र मंडळाने आयोजित केलेल्या दहीहंडी पह्डण्याचा मान मिळाला. यावेळी आमदार सुनील राऊत, राजू पावसकर मनसेचे प्रथमेश धुरी तसेच स्वराज्याचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

ताडदेव येथे शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर यांच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात ममता चषक पटकविण्यासाठी गोविंदांमध्ये चुरस रंगली. 4, 44,444 रुपयांच्या बक्षिसांची लयलूट करणाऱ्या या महोत्सवात 235 पथकांनी सलामी दिली. अंतिम फेरीत जायफळवाडी गोविंदा पथकाने बाजी मारली.

Comments are closed.